इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांसह तिघांना अटक
एक देशी पिस्तूल, दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जुलै 2025
मुंबई, – इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांसह तिघांना मालवणी आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. आरिफ इस्माईल शहा, नौशाद नासीर अहमद सलमानी आणि मोहम्मद शहाबुद्दीन मोहम्मद गुलशेर हाशम अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. या तिघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई शहरात त्यांचा घातक शस्त्रांची विक्रीचा प्रयत्न होता, मात्र त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
मालाडच्या मालवणी परिसरात काहीजण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक जीवन भातुकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे, पोलीस हवालदार अनिल पाटील, जगदीश घोसाळकर, पोलीस शिपाई सुशांत पाटील, सचिन वळतकर, मुद्दशीर देसाई, समीत सोरटे, कालिदास खुडे यांनी परिसरात गस्त सुरु केली होती.
ही गस्त सुरु असताना एम. व्ही देसाई मैदानाजवळ संशयास्पदरीत्या फिरणार्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे आरिफ शहा असल्याचे उघडकीस आले. तो रत्नागिरीच्या खेडचा रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी तो गावा येथे गेला होता. तेथून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे आणली होती. याच शस्त्रांची विक्रीसाठी तो मालवणी परिसरात आला होता. मात्र त्यापूर्वीच त्याला एक देशी पिस्तूल आणि चार काडतुसासह पोलिसांनी अटक केली.
दुसर्या घटनेत सांताक्रुज येथून दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. नौशाद सलमानी आणि मोहम्मद शहाबुद्दीन अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. ते दोघेही सांताक्रुज येथील रिलीफ रोड, यशोधाम बसस्टॉपसमोर गावठी कट्ट्याची विक्रीसाठी आले होते, ही माहिती मिळताच युनिट दहाच्या अधिकार्यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून दोन्ही आरोपींना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी दोन गावठी कट्टे आणि काडतुसे जप्त केले आहेत. दोन्ही आरोपी सांताक्रुज परिसरात राहत असून नौशाद हा जरीचे काम तर मोहम्मद शहाबुद्दीन हा खाजगी नोकरी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.