बोगस नोटाच्या डिलीव्हरीसाठी आलेल्या दोघांना अटक
बोगस नोटांसह नोटा बनविण्याचे 23 लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – बोगस नोटांच्या डिलीव्हरीसाठी आलेल्या दोन आरोपींना मालवणी पोलिसांनी अटक केली. संपत सामवय्या एंजपल्ली आणि रहिमपाशा याकूब शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे तेलंगणाचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी साडेआठ लाख रुपयांचे पाचशे रुपयांच्या बोगस नोटा, नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि एक कार असा 23 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालाडच्या मालवणी परिसरात एक बलोनो निळ्या रंगाची कार आली असून या कारमध्ये दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरत आहेत. त्यांच्याकडे बोगस नोटा असून या नोटांची डिलीव्हरीसाठी ते दोघेही तिथे आले आहेत अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे यांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश नगरकर, पोलीस निरीक्षक जीवन भातकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे, पोलीस हवालदार अनिल पाटील, जगदीश घोसाळकर, पोलीस शिपाई सुशांत पाटील, सचिन वळतकर, मुद्दसीर देसाई, समीत सोरटे, कालिदास खुडे यांनी तिथे साध्या वेशात गस्त सुरु केली होती.
ही गस्त सुरु असताना मार्वे रोडच्या साईबाबा मंदिराजवळ पोलिसांनी दोन्ही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह कारची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना 500 रुपयांच्या साडेआठ लाख रुपयांच्या भारतीय चलनाच्या बोगस नोटा, प्रिंटर, लॅपटॉप, इंक, पेपर, कटर, सेलोटेप, कैची, स्केल आदी 23 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. हा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर दोघांनाही कारसहीत पोलिसांनी पोलीस ठाण्यात पुढील चौकशीसाठी आणण्यात आले. चौकशीत या दोघांची नावे संपत एंजपल्ली आणि रहिमपाशा शेख असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही मूळचे तेलंगणाचे वारंगली आणि जयशंकरचे (भूपालंपली) रहिवाशी आहे.
पाचशे रुपयांच्या बोगस बनवून त्याची डिलीव्हरीसाठी ते दोघेही मुंबईत शहरात आले होते. एका खर्या नोटांच्या बदल्यात ते दोघेही तीन बोगस नोटा देत होते. खर्या नोटा घेतल्यानंतर बोगस नोटा देऊन ते दोघेही पळून जात होते. मात्र बोगस नोटांची डिलीव्हरी करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी शिताफीने अटक केली. ते दोघेही काहीच कामधंदा करत नव्हते. झटपट पैशांसाठी त्यांनी बोगस नोटा बनवून त्याची विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्याकडून बोगस नोटांसह बोगस नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि गुन्ह्यांतील कार पोलिसांनी जप्त केली आहे.
अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांनी आतापर्यंत किती रुपयांच्या बोगस नोटा बनविल्या आहेत, किती बोगस नोटा वितरीत केल्या आहेत, या नोटा त्यांनी कधी आणि कोणाला दिल्या आहेत याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.