मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुंबईसह इतर शहरात गांजा विक्री करणार्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण मुंबई, नाशिक व संभाजीनगरचे रहिवाशी आहेत. काही आरोपींविरुद्ध एनडीपीएससह इतर गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईत सुमारे 72 लाखांच्या गांजासह घातक शस्त्रे पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर असून त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत संबंधित आरोपी बुधवार 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालाडच्या मालवणी परिसरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून मालवणी पोलिसांना देण्यात आले होते. या आदेशानंतर या ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना मालाडच्या मालवणी परिसरात काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिपक हिंडे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक जीवन भातकुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ दुधमल, हरिश शिळमकर, साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे, मासाळ, पोलीस हवालदार अनिल पाटील, स्वप्नील काटे, पोलीस शिपाई साजिद शेख, मुद्दसीर देसाई, समीत सोरटे, कालिदास खुडे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
यावेळी तिथे आलेल्या वसिफ हुसैन आशिक हुसैन खान या 48 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक किलो साठ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून संतोष मोरे याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने नाशिकच्या चांदवड टोलनाका परिसरातून संतोष मोरे याला अटक केली. त्याच्या चौकशीत तो धुळे आणि नाशिक येथून चार आरोपींकडून गांजा घेत असल्याचे उघडकीस आले. ते चौघेही खाजगी वाहनांनी गांजा घेऊन मालवणी परिसरात येणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या पथकाने मालवणी, मढ येथून दोन वाहनांतून आलेल्या चौघांना ताब्यात घेतले होते.
त्यांच्याकडून पोलिसांनी 204 किलो गांजा, एक देशी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, दोन चारचाकी वाहन, पाच मोबाईल असा 72 लाख 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात गांजा विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीने ओरिसा येथून मोठ्या प्रमाणात गांजा आयात करुन त्याची मुंबईसह इतर शहरात विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचे इतर काही सहकारी असून ते वेगवेगळ्या शहरात गांजा तस्करीचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर या आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.