मालवणीतील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश

दोन्ही गुन्ह्यांतील चौघांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मालवणीतील एका बंद फ्लॅटसह खाजगी कार्यालयात झालेल्या सुमारे तेरा लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजा कायिन हरिजन, आकाश शशिकांत गरबेड, मोहम्मद युनूस उमरमियॉं शेख आणि ज्ञानेश्‍वर शंकरलाल गुप्ता अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का, त्यांच्याविरुद्ध अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

झकरिया सुफियान खान हे एसी मॅकनिक म्हणून काम करत असून सध्या मालाडच्या मालवणीतील एनसीसी दयासागर स्कूलजचळील प्लॉट क्रमांक ५६ मध्ये राहतात. मंगळवारी १५ ऑक्टोंबरला ते त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचा भाऊ मेहमूद यांच्याकडे म्हाडा, मालवणी येथील घरी जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. रात्री उशिरा तीन वाजता ते त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा कडी कोयंडाने तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता कपाटातील विविध सोन्याचे दागिने, एक लाख रुपयांची कॅश, एक मोबाईल असा ८ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. चोरीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मालवणी पोलिसांना ही माहिती दिली होती. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी झकरिया खान यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी राजा हरिजन आणि आकाश गरबेड या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते, त्यांच्या चौकशीतून त्यांनीच ही घरफोडी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

अशाच अन्य एका घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी मोहम्मद युनूस शेख आणि ज्ञानेश्‍वर गुप्ता या दोघांना अटक केली होती. या दोघांनी १४ ऑक्टोंबरला रात्री उशिरा मालवणीतील गेट क्रमांक सात, प्लॉट क्रमांक ३३ च्या रमझानी इंटरप्रायजेस या कार्यालयात घरफोडी केली होती. हसीन अहमद अन्सारी हे मालवणी परिसरात राहत असून त्यांचा रमझानी इंटरप्रायजेस नावाचे एक कार्यालय आहे. या कार्यालयात विविध बँकेसाठी बँकिंग सर्व्हिस सेंटर चालविण्याचे काम चालते. याच कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने सुमारे साडेचार लाखांची कॅश चोरी करुन पलायन केले होते. दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच हसीन अन्सारी यांनी मालवणी पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या मोहम्मद युनूस आणि ज्ञानेश्‍वर गुप्ता या दोघांनाही सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील काही मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page