सोशल मिडीयावर अश्लील फोटो व्हायरल करुन बदनामीचा प्रयत्न
हवाईसुंदरीच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सोशल मिडीयावर एका 22 वर्षांच्या हवाईसुंदरी तरुणीसह तिच्या दोन्ही बहिणीचा अश्लील फोटो अपलोड करुन अज्ञात व्यक्तीने तिघींची बदनामीसह विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या हवाईसुंदरी तरुणीच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमागे त्यांच्याच परिचित व्यक्तीचा सहभाग असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
22 वर्षांची तक्रारदार तरुणी ही हवाईसुंदरी असून ती तिच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या मालवणी, मढ परिसरात राहते. चार वर्षांपूर्वी तिने तिचे इंटाग्रामवर एक अकाऊंट ओपन केले होते. तिच्या बहिणीचा पती तिचा फॉलोअर आहे. तो तिच्या बहिणीला दारुच्या नशेत नेहमी मारहाण करत होता. त्याच्याकडून होणार्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून तिची बहिण त्याला सोडून माहेरी निघून आली होती. गेल्या दोन वर्षांपासून तिची बहिण त्यांच्यासोबत राहते. त्याचा तिच्या पतीला प्रचंड राग होता.
याच रागातून रविवारी तो त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने तलवारीने तिच्या आईला मारहाण केली होती. या घटनेनंतर तिने त्याच्याविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाता ती तिच्या घरी होती. यावेळी तिच्या एका मैत्रिणीने तिला सोशल मिडीयावर तिच्यासह दोन्ही बहिणीचे काही अश्लील फोटो अपलोड झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तिने तिचे सोशल अकाऊंटची पाहणी केली होती.
त्यात तिच्यासह तिच्या दोन्ही बहिणीचे अज्ञात व्यक्तीने अश्लील फोटो अपलोड करुन त्यांची बदनामी केल्याचे दिसून आले. या घटनंतर तिने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमातर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांत मालवणी पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहे. ते फोटो कुठल्या अकाऊंटवरुन अपलोड झाले, ते अकाऊंट कोणाचे आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात तक्रारदार तरुणीच्या परिचित व्यक्तीने संबंधित अश्लील फोटो अपलोड करुन तिच्यासह तिच्या बहिणीची बदनामी करुन विनयभंग केल्याचा पोलिसांचा संशय आहे.