बाईक चोरीच्या संशयावरुन तरुणाची मारहाण करुन हत्या
मालवणीतील घटना; गुन्हा दाखल होताच मारेकर्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – परिसरात पार्क केलेली बाईक चोरी करत असल्याच्या संशयाववरुन एका २५ वर्षांच्या तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या केल्याप्रकरणी इम्रान निसार अन्सारी या आरोपीस गुन्हा दाखल होताच मालवणी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर इम्रानला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर सचिन दशरथ जैस्वाल या तरुणाची हत्या केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आकाश संपत गायकवाड हा मूळचा धाराशिवचा रहिवाशी असून तो सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील गोराई परिसरात राहतो. एका खाजगी कंपनीत आकाश चालक म्हणून काम करतो. सचिन जैस्वाल हा बिगारी कामगार असून तो त्याचा मित्र आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजता त्याला सचिनने कांदिवलतील चारकोप, साईधाम परिसरात बोलाविले होते. तिथे भेटल्यानंतर ते दोघेही माालवणी येथे गांजा घेण्यासाठी आले होते. मालवणीतील एनसीसी गेट क्रमांक आठ, प्लॉट क्रमांक ६५ जवळ आल्यानंतर आकाश हा एका गल्लीत गेला तर सचिन हा बाईकजवळ उभा होता. रात्री साडेदहा वाजता तो गल्लीतून बाहेर आला असता त्याला तिथे गर्दी दिसली. त्यामुळे त्याने तिथे जाऊन पाहिले असता सचिन हा बेशुद्धावस्थेत पडला होता, त्याने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची काहीच हालचाल नव्हती. त्यामुळे त्याने त्याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
चौकशीदरम्यान सचिन हा बाईक चोरी करत असल्याचा संशयावरुन त्याला एका अज्ञात व्यक्तीने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आकाश गायकवाड याच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मारेकर्याचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीसह सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी इम्रान अन्सारी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सचिनला बाईक चोरीच्या संशयावरुन बेदम मारहाण केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.