मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून पत्नीची गळ्यावर वार पतीनेच हत्या केल्याची घटना मालवणी परिसरात घडली. हत्येनंतर आरोपी पतीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करुन पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. आयशा अखिल शेख असे या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी इन्तेफाक इद्रीस अन्सारी या २६ वर्षांच्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ही घटना शनिवारी सकाळी सहा वाजता मालाडच्या मालवणी अंबोजवाडीच्या मोन्या मशिदीजवळ घडली. या परिसरातील रुम क्रमांक २२२ मध्ये इन्तेफाक हा त्याची पत्नी आयशासोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरु होता. त्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडत होते. शनिवारी सकाळी सहा वाजता त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादानंतर त्याने आयशाच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. या घटनेनंतर तो मालवणी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची माहिती तिथे उपस्थित पोलिसांना सांगितली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घरात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या आयेशाला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी पती इन्तेफाक अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.
चौकशीत इन्तेफाकची आयेशा ही दुसरी पत्नी असून पूर्वी तिचे एका तरुणासोबत लग्न झाले होते. मात्र त्यांच्यात वाद झाल्याने तिने त्याला सोडून दिले होते. त्यानंतर तिने इन्तेफाकची लग्न केले होते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या पहिल्या पतीच्या संपर्कात आली होती. ही माहिती इन्तेफाकला समजताच त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यातून रागाच्या भरात त्याने आयेशाची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शनिारी सकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.