अनैतिक संबंधातून पतीची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

हत्येप्रकरणी पत्नीसह मित्राला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० फेब्रुवारी २०२५
मुंबई, – अनैतिक संबंधातून राजेश चव्हाण या ३० वर्षांच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीसह मित्राने दारु पाजून गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मिसिंग तक्रार दाखल होताच अवघ्या तीन तासांत पोलिसांनी आरोपी पत्नीसह मित्राला अटक करुन या हत्येचा पर्दाफाश करुन दोन्ही आरोपींना अटक केली. पूजा राजेश चव्हाण आणि इम्रान मोहम्मद रिझवान अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पूजाने तिच्या दोन्ही मुलांसमोरच पतीची हत्या केली असून दहा आणि आठ वर्षांचे दोन्ही मुले या घटनेचे मुख्य साक्षीदार असल्याचे बोलले जाते.

राजेश हा त्याची पत्नी आणि दोन मुलासंोबत मालाड येथील मालवणीतील राठोडी, गावदेवी मंदिर, सोहरभ कंपाऊंड परिसरात राहतो. ते दोघेही रोजदांरीवर काम करत असून राजेशला दारु पिण्याचे व्यसन होते. इम्रान हा राजेशचा मित्र असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. तिथे नोकरी मिळत नसल्याने तो नोकरीसाठी मुंबईत आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो राजेशसोबत त्याच्या घरी राहत होता. ते दोघेही त्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होते. याच दरम्यान इम्रान आणि पूजा यांच्यात जवळीक निर्माण झाले होते. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या अनैसिंक संबंधातून त्यांनी राजेशच्या हत्येचा कट रचला होता.

ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री त्यांनी राजेशला दारु पाजली. जास्त दारु प्यायल्यानंतर तो घरातच झोपला होता. यावेळी पूजाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करुन हत्या केली. हत्येनंतर या दोघांनी त्याचा मृतदेह राठोडी गावापासून काही अंतरावर फेंकून दिला होता. त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी रक्ताचे डाग पुसून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते दोघेही मालवणी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी राजेशच्या मिसिंगची तक्रार केली होती. सोबत त्यांनी राजेशचा फोटो नेला होता.

मिसिंग तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर एका फुटेजमध्ये पूजा, राजेश आणि इम्रान हे तिघेही ट्रिपल सीटने बाईकने जाताना दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटताच पोलिसांनी पूजा आणि इम्रानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला पूजाने राजेशला दारु पिण्याचे व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमीच खटके उडत असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नंतर तिने इम्रानच्या मदतीने राजेशची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाहून राजेशचा मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ही हत्या राजेशच्या दोन्ही मुलांसमोर झाली होती, मात्र ते दोघेही प्रचंड घाबरलेले आहे. त्यामुळे त्यांची पोलिसांनी चौकशी केली नव्हती. ते दोघेही मुख्य साक्षीदार असल्याने त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page