मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑगस्ट 2025
मुंबई, – पार्किंगवरुन झालेल्या वादातून साहिल शाहिद गुज्जर या 27 वर्षांच्या कॅबचालक तरुणाची सातजणांच्या टोळीने लाथ्याबुक्यांसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या सातजणांविरुद्ध मालवणी पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत रात्री उशिरा दोघांना पोलिसांनी अटक केली होती. पार्किंग माफियाकडून घडणार्या शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट असताना एका तरुणाची इतक्या क्रुरपणे मारहाण करुन त्याची हत्या झाल्याने मालवणी परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान परिस्थिती चिघळू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवारी 15 ऑगस्टला सायंकाळी सात वाजता मालाडच्या मालवणी ईदगाह मैदानाजवळील प्लॉट क्रमांक 50 मध्ये घडली. या परिसरात काहीजण अनधिकृत पार्किंग लावून वाहनचालकाकडून पैशांची वसुली करतात. अनेकदा पैशांवरुन ही टोळी संबंधित चालकांना शिवीगाळ करुन मारहाण करतात. शुक्रवारी साहिल हा तिथे गेला होता. यावेळी त्याचे आरोपीसोबत पार्किंगवरुन वाद झाला होता. या भांडणाची माहिती त्याचा भाऊ आदिलला समजताच तो तिथे गेला होता. यावेळी त्याला साहिलला काहीजण लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्यालाही बेदम मारहाण केली होती. त्यामुळे आदिल स्वताचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळून गेला. त्यानंतर त्यांनी साहिलला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला आदिलने तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आदिलच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सातजणांविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हत्येच्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागला होता. सध्या तेथील वातावरण शांत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश मालवणी पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी हल्ल्यानंतर पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दोन आरोपींना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.
त्यांच्या चौकशीतून इतर पाचजणांची नावे समोर आली असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मृत साहिल गुज्जर हा कांदिवलीतील गणेशनगर परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. तो कॅबचालक म्हणून कामाला होता. गुज्जर कुटुंबियांचा तो एकुलता एक कमविता व्यक्ती होता. 30 ऑगस्टला त्याचे लग्न होणार होते. त्यासाठी त्याच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती. मात्र त्यापूर्वीच त्याच्या हत्येने गुज्जर कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. आरोपींविरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी गुज्जर कुटुंबियांनी केली आहे.