बहिणीच्या प्रियकराची हत्या करुन भावाचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण
आई-बहिणीच्या चारित्र्यावरुन आक्षेपार्ह विधान करणे जिवावर बेतले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 सप्टेंबर 2025
मुंबई, – बहिणीच्या प्रियकराची हत्या करुन आरोपी भावाने मालवणी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आशिष जोसेफ शेट्टी असे या 21 वर्षीय आरोपी भावाचे नाव असून त्याच्याविरुद्ध हत्येच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर नितीन प्रेमजी सोलंकी या 40 वर्षांच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप असून आशिषच्या आई-बहिणीच्या चारित्र्यावरुन आक्षेपार्ह विधान करणे त्याच्या जिवावर बेतल्याचे तपास अधिकारी गोकुळ जगताप यांनी सांगितले. शनिवारी दुपारी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने मालवणी परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलीस उपनिरीक्षक विशाल राऊत हे मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असून शनिवारी ते दिवसपाळी ड्युटीवर हजर होते. दुपारी बारा वाजता पोलीस ठाण्यात आशिष शेट्टी हा तरुण आला आणि त्याने मालाडच्या मालवणी, मार्वे रोड, रामेश्वर गल्लीतील कोळीवाडा कृष्णा आश्रमाजवळील रुम क्रमांक एकमध्ये नितीन सोळंकी यांची हत्या केल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ जगताप, उपनिरीक्षक विशाल राऊत व अन्य पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे गेल्यानंतर नितीन सोळंकी हा जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तपासात नितिन हा जोगेश्वरीतील गुंफा रोड, संजय गांधी नगर, कालिमाता चाळीत राहत होता. तो एका हॉस्पिटलमध्ये केअरटेकर म्हणून काम करत होता. त्याचे आशिषच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. आशिष हा त्याच्या आई-बहिणीसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहत होता. त्याला त्याच्या बहिणीचे नितीनसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून नितीन हा त्याच्या बहिणीसह आईच्या चारित्र्याविषयी आक्षेपार्ह विधान करत होता. त्यांच्याविषयी सतत वाईट बोलत असल्याने त्यांच्यात वाद सुरु होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. त्यातूनच त्याने नितीनचा काटा काढायची योजना बनविली होती.
शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता आशिष हा जोगेश्वरी येथे गेला होता. तिथेच त्यांनी एकत्र मद्यप्राशन केले होते. रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन केल्यानंतर ते दोघेही सकाळी कोळीवाडा कृष्णा आश्रमाजवळील रुम क्रमांक एकमध्ये आले होते. यावेळी रागाच्या भरात आशिषने नितीनची लाकडी दांड्याने बेदम मारहाण हत्या केली. या हत्येनंतर तो प्रचंड घाबरला आणि मालवणी पोलीस ठाण्यात आला. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याने नितीनच्या हत्येची कबुली दिली.
तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक विशाल राऊत यांच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी आशिष शेट्टीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हत्येची रुमची पोलिसांनी सील केली असून गुन्ह्यांत वापरलेला लाकडी दांडा पोलिसांनी जप्त केला आहे. नितीनचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना सोपविण्यात आला आहे. गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ जगताप हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.