मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 सप्टेंबर 2025
मुंबई, – भाड्यावरुन झालेल्या वादातून आश्रफ अली मोहम्मद खान या 43 वर्षांच्या फ्लॅटमालकाची त्याच्याच वयोवृद्ध भाडेकरुने छातीत जोरात लाथ मारुन हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच 60 वर्षांच्या इम्तियाज हुसैन सय्यद या वयोवृद्ध भाडेकरुला मालवणी पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी दुपारी बारा वाजता मालाड येथील मालवणीतील म्हाडा, श्री समर्थ सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 701 मध्ये घडली. शबनम आश्रफ खान ही महिला अंधेरीतील वर्सोवा, आरामनगरच्या शांतीनिकेतन इमारतीमध्ये राहते. मृत आश्रफ खान हे तिचे पती असून त्यांच्या मालवणीतील म्हाडामध्ये श्री समर्थ सोसायटीमध्ये एक फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये आरोपी इम्तियाज सय्यद हा भाडेकरु म्हणून राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना इम्तियाजकडून नियमित भाडे मिळत नव्हते. याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. भाड्याविषयी बोलणीसाठी आश्रम खान हे रविवारी दुपारी त्यांच्या म्हाडाच्या सोसायटीमध्ये गेले होते. तिथे त्यांचे इम्तियाजसोबत भाड्याच्या पैशांवरुन वाद झाला होता.
या वादात रागाच्या भरात इम्तियाजने आश्रफ अली खान यांच्या छातीत जोरात लाथ मारली होती. त्यात ते बेशुद्ध पडले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाइी दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आश्रफ अलीचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूस भाडेकरु इम्तियाज सय्यद हाच जबाबदार होता. त्यामुळे शबनम खान हिच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी इम्तियाजविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर इम्तियाजला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. भाड्यावरुन झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.