मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ मार्च २०२४
मुंबई, – डीटीडीसी पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स कंपनीची सोशल साईटवर बोगस वेबसाईटसह मोबाईल क्रमांक अपलोड करुन कंपनीचा कर्मचारी बोलत असल्याची बतावणी करुन छत्तीसगढ येथे साडेचार लाखांची महागडी बाईक डिलीव्हरीच्या नावाने फसवणुक करणार्या एका वॉण्टेड आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली. मोहीत अदालतीप्रसाद कनोजिया असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
३८ वर्षांचे वसीम बाबा शेख हा मालाडच्या मार्वे रोड, मानवस्थळ अपार्टमेंटमध्ये राहतो. तो गोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याच्या मालकीची रॉयल एनफिल्ड कंपनीची सुपर मेटेओर ६५० मॉडेलची एक बाईक आहे. ही बाईक त्याला विक्री करायची असल्याने त्याने ओएलएक्सवर बाईक विक्रीची जाहिरात दिली होती. १४ जानेवारी २०२४ रोजी ही जाहिरात पाहून त्याला हरसिमरनसिंग ओबेरॉय या छत्तीसगढ येथे राहणार्या व्यक्तीने फोन केला होता. ही बाईक पसंद असल्याने त्याने त्याने बाईक खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. बाईकची मूळ किंमत साडेचार लाख रुपये होती, मात्र चर्चेअंती त्यांच्यात ३ लाख ९० हजारांमध्ये बाईक खरेदी-विक्रीचा सौदा पक्का झाला होता. त्यामुळे त्याने त्याला टोकन म्हणून दहा हजार रुपये पाठवून दिले होते. बाईक डिलीव्हरी केल्यांनतर उर्वरित पेमेंट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर वसीमने गुगलवर डीटीडीसी पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना छत्तीसगढ येथे एक बाईक पाठवयाची आहे असे सांगितले होते. यावेळी समोरील व्यक्तीने तो सतीश राजपूत बोलत असून कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. बाईक पाठविण्यासाठी त्याने त्याला १७ हजार ६३९ रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले होते.
ठरल्याप्रमाणे १८ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा सुरज नावाचा एक कर्मचारी वसीमच्या घरी आला होता. यावेळी त्याने सुरजला ती बाईक देताना त्याला १४ हजार २९० रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने बाईकची डिलीव्हरी केली नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच वसीम हा अंधेरी-कुर्ला रोडवरील मुकूंद नगर सोसायटीमध्ये असलेल्या कंपनीच्या कार्यालयात गेला होता. यावेळी तिथे त्याला डीटीडीसी पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स कंपनीचे कुठलेही कार्यालय नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तो आनंदनगर येथील कंपनीच्या कार्यालयात गेला आणि त्याने घडलेला प्रकार तिथे उपस्थित कर्मचार्यांना सांगितले. त्याने दिलेली वेबसाईटची माहितीसह मोबाईल बोगस असल्याचे तिथे उपस्थित कर्मचार्याने सांगितले. त्याच्या घरी कंपनीचा कोणीही कर्मचारी आला नव्हता. तसेच त्यांना छत्तीसगढ येथे बाईक डिलीव्हरीसाठी करण्यासाठी कुठलीही ऑर्डर प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. अज्ञात व्यक्तींनी तो डीटीडीसी पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स कंपनीचा कर्मचारी असल्याची बतावणी करुन त्याने त्याच्या बाईकसह डिलीव्हरीसाठी दिलेल्या पैशांचा अपहार केला होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच वसीम शेखने मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीसह मोबाईल क्रमांकावरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मोहीत कनोजिया या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीत त्याच्या इतर सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.