मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 मे 2025
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरात एक दिवसांच्या नवजात अर्भकाला टाकून अज्ञात महिलेने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या महिलेच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांत प्रसुती झालेल्या महिलेची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालाड येथील मालवणीतील म्हाडा गेट क्रमांक आठ, कला विद्यालयासमोरील कचराकुंडीत एक नवजात अर्भक पडल्याची माहिती सोमवारी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी कचराकुंचीत पोलिसांना एक दिवसांचे नवजात अर्भक सापडले. त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. एक दिवसांचे ते अर्भक पुरुष जातीचे असून त्याचा जन्म लपविण्याच्या उद्दशेाने अज्ञात महिलेने त्याला कचराकुंडीत टाकून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या महिलेविरुद्ध पोलिसांनी नवजात अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत मालवणी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत विविध शासकीय आणि खाजगी रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलांसह त्यांच्या बाळांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या महिलेचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.