ड्रग्जमिश्रीत सिरपची विक्रीसाठी आलेल्या दुकलीस अटक
साडेतीन लाखांच्या 710 ड्रग्जमिडीत सिरपच्या बॉटल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरात कोडेन फॉस्पेटमिश्रीत ड्रग्ज सिरपची विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीस मालवणी पोलिसांनी अटक केली. रिझवान वकिल अन्सारी आणि नावेद अब्दुल हमीद बटाटावाला अशी या दोघांची नावे असून ते दोघेही धारावी आणि डोंगरीचे रहिवाशी आहेत. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी कोडेन फॉस्पेटमिश्रीत कफ सिरपच्या 710 प्लास्टिक बॉटल जप्त केल्या असून त्याची किंमत साडेतीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालवणी परिसरात ड्रग्ज तस्करीसह विक्रीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मालवणी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. या मोहीमेतर्गत सोमवारी रात्री मालवणी पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी मालाडच्या मालवणी, मार्वे रोड, एम. व्ही देसाई मैदानाच्या बाजूला काहीजण संशयास्पदरीत्या फिरताना दिसले होते. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे, पोलीस हवालदार पाटील, घोसाळकर, पोलीस शिपाई पाटील, वळतकर, देसाई, खुडे यांनी संशयास्पद फिरणार्या दोन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्यांच्याकडील गोणीची पाहणी केली असता त्यात या अधिकार्यांनी कोडेन फॉस्पेट या ड्रग्जमिश्रीत कफ सिरपच्या 710 हून अधिक बॉटल्स सापडल्या. या बॉटलची विक्रीसाठी करण्यासाठी ते दोघेही मालवणी परिसरात आले होते, मात्र त्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून 3 लाख 55 हजाराच्या ड्रग्जमिश्रीत कफ सिरपच्या बॉटल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
यातील रिझवान हा धारावी तर नावेद हा डोंगरी परिसरात राहतो. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांना संबंधित ड्रग्जमिश्रीत कफ सिरपच्या बॉटल्स कोणी दिले, त्याची त्यांनी यापूर्वीही विक्री केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.