शारीरिक संंबंधाला नकार दिला म्हणून महिलेवर चाकूने हल्ला
मालवणीतील घटना; सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२४
मुंबई, – शारीरिक संबंधाला नकार दिला म्हणून एका ३८ वर्षांच्या महिलेवर तिच्याच परिचित सुरक्षारक्षकाने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात या महिलेच्या मानेवर आणि पोटावर गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी प्रकाश नावाच्या आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध मालवणी पोलिसांनी विनयभंगासह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर प्रकाश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना सोमवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास मालाडच्या मालवणी, मढच्या व्यासवाडी, शास्वत फिल्म प्रोडेक्शन हाऊसमध्ये घडली. तक्रारदार महिला ही मढच्या विलासवाडी परिसरात राहत असून याच परिसरात प्रकाश हादेखील राहतो. एकाच परिसरात राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. ही महिला शास्वत फिल्म प्रोडेक्शन हाऊसमध्ये केअरटेकर तर प्रकाश हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सोमवारी दुपारी एक वाजता प्रकाशने तिला तिचे तीन मांजरी त्यांच्या बंगल्यात घुसले आहे. त्यांना बाहेर घेऊन जा असे सांगून बंगल्यात आत येण्यास प्रवृत्त केले. तिथे कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याश जवळीक निर्माण करुन तिचा हात पकडला. त्यानंतर त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तिने त्याला नकार देत तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी रागाच्या भरात त्याने तिच्या मानेवार आणि पोटावर चाकूने वार केले होते. तिने हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून त्याने तिला आतील रुममध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर प्रकाश तेथून पळून गेला होता.
काही वेळानंतर या महिलेने स्वतची सुटका केली आणि घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगितला. चाकू हल्ल्यात तिच्या मानेवर आणि पोटावर दुखापत झाली होती, त्यामुळे तिच्यावर जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. औषधोपरानंतर तिने प्रकाशविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रकाशविरुद्ध पोलिसांनी १०९, ६४, ६२, ७४, ७५, ११८ (१), १२७ (२) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर अटकेच्या भीतीने प्रकाश हा पळून गेला आहे. त्याचा मालवणी पोलिसांकडून शोध सुरु आहे.