महिलेवर चाकू हल्ला करणार्या सुरक्षारक्षकाला बिहारहून अटक
शरीर संबंधास नकार दिला म्हणून केला होता हल्ला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२४
मुंबई, – मांजरीचा बहाणा करुन एका ३८ वर्षांच्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करणार्या आरोपी सुरक्षारक्षकाला बिहारहून अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. प्रकाशकुमार योगिंदरकुमार मांझी असे या २८ वर्षीय आरोपीचे नाव असून हल्ल्यानंतर तो मुंबईहून बिहारला पळून गेला होता, बहिणीच्या घरी लपलेल्या प्रकाशकुमार पोलिसांनी अटक करुन ट्रॉन्झिंट रिमांडवर मुंबईत आणले होते. विनयभंगासह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवार २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी १५ जुलै २०२४ रोजी दुपारी एक ते दोनच्या सुमारास मालाडच्या मालवणी, मढच्या व्यासवाडी, शास्वत फिल्म प्रोडेक्शन हाऊसमध्ये घडली. ३८ वर्षांची तक्रारदार महिला ही मढच्या विलासवाडी परिसरात राहत असून याच परिसरात प्रकाशकुमार हादेखील राहतो. एकाच परिसरात राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. ही महिला शास्वत फिल्म प्रोडेक्शन हाऊसमध्ये केअरटेकर तर प्रकाशकुमार हा तिथेच असलेल्या एका बंगल्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सोमवारी दुपारी एक वाजता प्रकाशकुमारने तिला तिचे तीन मांजरी त्यांच्या बंगल्यात घुसले आहे. त्यांना बाहेर घेऊन जा असे सांगून बंगल्यात आत येण्यास प्रवृत्त केले. यावेळी बंगल्यात कोणीही नव्हते. हीच संधी साधून त्याने त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिचा हात पकडला. त्यानंतर त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्याला नकार देताच त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्याचा राग आल्याने त्याने तिच्या मानेवार आणि पोटावर चाकूने वार केले होते. तिने हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून त्याने तिला आतील रुममध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर प्रकाशकुमार तेथून पळून गेला होता. काही वेळानंतर या महिलेने स्वतची सुटका केली आणि घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगितला. चाकू हल्ल्यात तिच्या मानेवर आणि पोटावर दुखापत झाली होती, त्यामुळे तिच्यावर जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. औषधोपरानंतर तिने प्रकाशविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रकाशविरुद्ध पोलिसांनी १०९, ६४, ६२, ७४, ७५, ११८ (१), १२७ (२) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
प्रकाशकुमार हा मूळचा बिहारचा रहिवाशी असल्याने तो त्याच्या गावी पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मालवणी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत दोन विशेष पथकाची नियुक्ती केली होती. एका पथकाला पुण्यात तर दुसर्या पथकाला बिहारला पाठविण्यात आले होते. त्याचा शोध सुरु असतानाच प्रकाशकुमार हा गावी आला असून तो त्याच्या बहिणीकडे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर त्याला त्याच्या बहिणीच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत ताब्यात घेतल्यानंतर त्याला तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. विनयभंगासह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.