मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर एका २१ वर्षांच्या तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी करण रमेश कुराडे या आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली. करण हा तक्रारदार तरुणीचा माजी प्रियकर असून तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्यातून रागाच्या भरात त्याने तिच्या नावाने बोगस अकाऊंट उघडून तिचे जुने व्हिडीओ अपलोड करुन तिची बदनामी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
२१ वर्षांची तक्रारदार तरुणी ही मालाडच्या मार्वे रोड परिसरात राहते. सध्या ती पुण्यात बीएचएमएसच्या पहिल्या वर्षांत शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी तिची तिच्या भावाचा मित्र करण कुराडेशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. मैत्रीनंतर त्याने तिला प्रपोज केले होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र तो नशा करत असल्याने, त्याच्या स्वभावात अचानक बदल झाल्याने तसेच तो तिला सतत त्याच्यासोबत राहण्याची धमकी देत असल्याने तिने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वादही झाली होता. या वादानंतर तिने त्याला त्याच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही तो तिचा पाठलाग करुन तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता. नोव्हेंबर २०२३ ती शिक्षणासाठी पुण्याला गेली होती. सुट्टीसह अधूनमधून ती तिच्या घरी येत होती. यावेळी करण हा तिचा पाठलाग करत होता. घरात वाद होऊ नये म्हणून तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.
३० जुलैला ती इंटाग्राम पाहत होती. यावेळी तिला तिच्या नावाने कोणीतरी बोगस अकाऊंट उघडून तिचे जुने व्हिडीओ अपलोड केल्याचे दिसून आले. ते व्हिडीओ संबंधित व्यक्तीने तिच्या मित्रांना टॅग केले होते. करणनेच तिची बदनामीच्या उद्देशाने तिचे जुने व्हिडीओ अपलोड केल्यंाची माहिती प्राप्त होताच तिने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितली. त्यामुळे त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने जुलै महिन्यांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना दोन महिन्यानंतर करण कुराडे याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.