मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरात राहणार्या एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला धमकी देऊन त्याच्यावर दोन अल्पवयीन मुलांनी अनैसगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोळा आणि तेरा वर्षांच्या या दोन्ही मुलांना मालवणी पोलिसांनी ताब्यात घेऊन डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले आहे तर या दोघांना मदत केल्याप्रकरणी २१ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
३५ वर्षांचे तक्रारदार मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून रिक्षाचालक म्हणून काम करतात. त्यांना अकरा वर्षांचा मुलगा असून तो सध्या शाळेत शिकतो. तिन्ही आरोपी बळीत मुलाच्या परिचित असून एकमेकांना ओळखतात. २७ सप्टेंबरला सोळा आणि तेरा वर्षांच्या दोन्ही अल्पवयीन आरोपींनी त्याच्या एका सहकार्यांच्या मदतीने बळीत मुलाला बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या दोघांनी बळीत मुलाशी अश्लील चाळे करुन त्याच्याशी अनैसगिक लैगिंक अत्याचार केला होता. याकामी या दोन्ही मुलांना २१ वर्षांच्या आरोपीने मदत केली होती. सोमवारी हा प्रकार या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितला होता. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही अल्पवयीन मुलासह तरुणाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध अनैसगिक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यातील सोळा आणि आणि तेरा वर्षांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर २१ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.