गाडीतून उतरविले म्हणून डिलीव्हरी बॉय तरुणावर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत मित्राला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गाडीतून उतरविले म्हणून रागाच्या भरात डिलीव्हरी बॉय तरुणावर त्याच्याच मित्राने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. या हल्ल्यात राजकुमार दिनेश भारती (२१) हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हल्ल्यानंतर पळून गेलेल्या कादिर कमरअली शेख या २४ वर्षांच्या आरोपी मित्राला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री मालाड येथील मालवणीतील खारोडी गाव, निलेश मेडीकलसमोर घडली. राजकुमार हा खारोडी गावच्या इनासवाडी परिसरात राहत असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. कादिर हा त्याच्या परिचित असून तोदेखील तिथेच राहतो. मंगळवारी ते दोघेही राजकुमारच्या गाडीतून जात होते. मात्र काही अंतर आल्यानंतर राजकुमारने कादिरला उतरण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. अचानक गाडीतून उतविल्याने कादिरला स्वतचा अपमान झाल्यासारखे वाटले होते. त्याचा राग आल्याने त्याने राजकुमारवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्याच्या उजव्या हाताला, मनगटावर, छातीला आणि तोंडाला दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर कादिर हा पळून गेला होता. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी जखमी झालेल्य राजकुमारला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राजकुमारच्या जबानीवरुन पोलिसांनी कादिर शेख याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या कादिरला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.