मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2025
मुंबई, – पाण्याच्या बाटलीच्या आड ड्रग्ज तस्करी करणार्या एका टोळीचा मालवणी पोलिसांनी पर्दाफाश करुन दोन आरोपींना अटक केली. विनित सुनिल सिंह आणि शिवेन मंगेश पारकर अशी या दोघांची नावे असून या दोघांकडून पोलिसांनी साडेनऊ लाखांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या आठवड्यात मालवणी पोलीस ठाण्यात ड्रग्ज तस्करीप्रकरणी एका गुन्ह्यांची नोंद केली होती. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई घोसाळकर, सुशांत पाटील, सचिन बळतकर, समीर सोरटे, मुदस्सर देसाई या पोलीस पथकाकडून तपास होता. आरोपींच्या फोटोसह मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन मिरारोड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी ओल्ड गोल्डन नेस्ट, स्वर्णदिप सोसायटी, इमारत क्रमांक पाचमध्ये पोलिसांनी छापा टाकून विनित सिंह आणि शिवेन पारकर या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 73.9 ग्रॅम वजनाचे हायड्रो गांजा, 4.7 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, 45 एलएसडी डॉट पेपर तर 62 एलएसडी डॉट पेपर असा सुमारे साडेनऊ लाखांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या ड्रग्जची ते दोघेही लवकरच विक्री करणार होते. मात्र ड्रग्ज विक्री करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.