अश्लील फोटो पतीला पाठविण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल
मैत्रिणीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – शारीरिक संबंधाचे फोटो पतीला पाठविण्याची धमकी देऊन एका तरुणाने तिच्याच विवाहीत मैत्रिणीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. मैत्रिणीला ब्लॅकमेलसह धमकी देऊन तो तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन अजहर नावाच्या २५ वर्षांच्या मित्राविरुद्ध मालवणी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुुरु केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
२४ वर्षांची पिडीत तरुणी वसई परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. २०१७ रोजी ती सोळा वर्षांची असताना तिची अजहरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. डिसेंबर २०१७ ते जुलै २०२२ या कालावधीत ते दोघेही त्यांच्या मैत्रिणीच्या घरी भेटत होते. याच दरम्यान त्याने तिच्याशी ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. नंतर पिडीत तरुणीचे लग्न झाले होते. लग्नानंतरही तो तिच्या संपर्कात होता. अनेकदा तो तिला भेटायला येण्याचा आग्रह करत होता. मात्र लग्नानंतर तिने त्याला भेटण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो तिला ब्लॅकमेल करु लागला. त्याला भेटायला आली नाहीतर तिचे सर्व अश्लील फोटो तिच्या पतीला पाठविण्याची धमकी देत होता. बदनामीच्या भीतीने ती त्याला मालाड येथील आक्सा बिचजवळील लॉजमध्ये भेटायला जात होती. तिथेही त्याने तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्याच्याकडून तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता.
शारीरिक संबंधाला नकार दिल्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करुन धमकी देत असल्याने तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तसेच अजहरविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६, ३७६ (१), (एन), ५०६ भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. अजहर हा मालाडच्या मालवणी, म्हाडा परिसरातील रहिवाशी असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.