मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ डिसेंबर २०२४
मुंबई, – मालाडच्या मालवणीतील एका मदरसामध्ये अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली आहे. या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. मात्र या मुलाच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. मृत मुलाच्या आई-वडिलांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यांनी या घटनेमागे कोणालाही जबाबदार धरले किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. त्यांच्या जबानीनंतर मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
मृत मुलगा अकरा वर्षांचा असून तो त्याच्या आई-वडिल आणि भावांसोबत मालाडच मालवणी, गेट क्रमाक आठमध्ये राहत होता. याच परिसरात एक मदरसा असून तिथेच तो त्याच्या भावासोबत शिक्षण घेत होता. या दोघांसोबत मदरसामध्ये इतर बारा मुले शिक्षण घेत होते. शनिवारी तो त्याच्या भावासोबत नेहमीप्रमाणे मदरसामध्ये गेले होते. रात्री उशिरा तिथे कोणीही नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर त्याच्या भावाच्या निदर्शनास येताच त्याने ती माहिती स्थानिक रहिवाशांना दिली. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून मालवणी पोलिसांना देण्यात आली होती. या मुलाला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी मदरसाचा मौलाना, मृत मुलाचे आई-वडिल आणि भावाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. त्याचा अंत्यविधी झाला असून अंत्यविधीत मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवाशी सामिल झाले होते.