तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून दुसर्या तरुणीशी विवाह करुन फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मालाड येथे राहणार्या सानिका राजू साबळे या २२ वर्षांच्या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी जितेश गाडे या २८ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या सानिकाला लग्नाचे आमिष दाखवून जितेशने जानेवारी महिन्यांत दुसर्या तरुणीशी विवाह करुन तिची फसवणुक केली होती, त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून सानिकाने तिच्या आजीच्या राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून जितेशची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
ही घटना सोमवारी १० फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता मालाड येथील मालवणीतील मार्वे रोड, अली तलावख महालक्ष्मी मंदिराजवळील महालक्ष्मी चाळीत घडली. याच परिसरात बिजू राजू साबळे ही महिला तिचा २६ वर्षांचा मुलगा सनी आणि २२ वर्षांची मुलगी सानिकासोबत राहते. ती घरकाम करते तर तिचा मुलगा एका खाजगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून कामाला आहे. सानिका ही गेल्या तीन वर्षांपासून मालवणी परिसरात इन्व्हीटेशनचे काम करत होती. याच परिसरात राहणार्या जितेशसोबत तिचे चार वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध होते. याबाबत तिने तिच्या आईसह भावाला कधीच सांगितले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी तिला तिच्या काही परिचित लोकांकडून सानिका आणि जितेश यांच्यातील प्रेमसंबंधबाबत माहिती समजली होती. याबाबत तिने सानिकाकडे विचारणा केली नव्हती.
२६ जानेवारी २०२५ रोजी जितेशने त्याच्या गावी एका तरुणीसोबत लग्न केले होते. जितेशच्या लग्नाची माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ९ फेब्रुवारीला रात्री दिड वाजता सानिका ही घरी आली होती. यावेळी तिच्या चेहर्याला किरकोळ जखम झाल्याचे तिला दिसले होते. तिने तिला विचारले असता सानिकाने रस्त्यावरुन चालताना पडल्याचे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता ती कामावर जाते असे सांगून निघून गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नव्हती. त्यामुळे बिजूसह तिचा मुलगा सनी यांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्यांना प्रतिसाद दिला नाही. रात्री नऊ वाजता सनी हा फेरफटका मारण्यासाठी गेला होता. यावेळी तो त्याची आजी शांताबाई साबळे हिच्या राहत्या घरातील तिसर्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सानिकाने सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
हा प्रकार पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला होता. त्याने तिला खाली उतरवून जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपासात सानिकाला जितेशने लग्नाचे आश्वासन दिले होते, मात्र त्याने तिच्याशी लग्न न करता गावी जाऊन दुसर्या तरुणीसोबत लग्न केले होते. त्याचा सानिकाला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून तिने तिच्या आजीच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन जीवन संपविले होते. सानिकाच्या आत्महत्या करण्यामागे जितेश हाच जबाबदार असल्याचा आरोप करुन बिजू साबळे हिने मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जितेश गाडे याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.