चोरीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या कॅशिअर चार महिन्यांनी अटक
सुपर मार्केटमध्ये वषर्भरात बारा लाखांची चोरी केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जुलै 2025
मुंबई, – चोरीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका कॅशिअरला मालवणी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. जेठाराम हरिराम पटेल असे या 26 वर्षीय आरोपी कॅशिअरचे नावअसून त्याने त्याच्या किराणा मालाच्या सुपर मार्केटमध्ये मे 2024 ते मार्च 2025 या कालावधीत सुमारे बारा लाखांची कॅशची चोरी केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे.
भिमाराम सुराराम चौधरी हे मालाडच्या मालवणी, जनकल्याण नगर परिसरात राहतात. याच परिसरात त्यांचा मालकीचे किराणा मालाचे एक सुपर मार्केट असून तिथे बारा कामगार कामाला आहेत. त्यात जेठारामचा समावेश असून तो कॅशिअर म्हणून कामाला होता. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कामगाराला आपआपले काम वाटून दिले होते. मार्च महिन्यांत त्यांना दुकानात आलेला माल आणि विक्री झालेल्या मालाच्या हिशोबात प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी अकाऊंटची जबाबदारी असलेल्या कर्मचार्यांकडे चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना जेठाराम पटेलचे काऊंटरवर काम करताना वर्तन संशयास्पद तसेच तो त्याच्या खिशात रोज काही तरी ठेवत असल्याचे दिसून आले.
जेठारामला जुना कर्मचारी असल्याने त्यांनी त्याला थेट काही न विचारता तेथील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली होती. त्यात त्यांना जेठाराम हा काऊंटरमधील कॅश चोरी करत असल्याचे दिसून आले. त्याच्या बँक खात्याची स्टेटमेंटची पाहणी केल्यानंतर तो नियमित त्याच्या बँक खात्यात काही रक्कम जमा करत असल्याचे दिसून आले. याबाबत त्याच्याकडे त्यांनी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देऊन त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर त्याने कॅश काऊंटरमधून पैसे चोरी केल्याचे तसेच ती रक्कम पुन्हा ठेवल्याचे सांगितले. या घटनेनंतर त्यांनी संपूर्ण अकाऊंटची तपासणी सुरु केली होती.
त्यात त्यांना मे 2024 ते मार्च 2025 या कालावधीत जेठारामने सुमारे 14 लाखांची कॅश चोरी केल्याचे दिसून आले. पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देताच त्याने ही कॅश चोरी केल्याची कबुली दिली. आर्थिक अडचण असल्याने त्याने ही चोरी केली असून ही रक्कम त्यांना परत करण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना दोन लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित बारा लाख रुपये न देता तो पळून गेला होता. त्याचा भिमाराम चौधरी यांनी शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्यांनी जेठाराम पटेलविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या जेठारामला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतल लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्याकडून चोरीची उर्वरित कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.