चोरीसाठी मंदिर टार्गेट करणार्‍या ज्वेलर्स व्यापार्‍याला अटक

तीन मंदिरात चोरी केल्याची कबुली देत चोरीचे सर्व चांदीचे जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – चोरीसाठी मंदिर टार्गेट करणार्‍या एका ज्वेलर्स व्यापार्‍याला राजस्थान येथून एल. टी मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. कपिल ब्रिजमोहन सोनी असे या 24 वर्षीय आरोपी व्यापार्‍याचे नाव असून त्याच्या अटकेने एल. टी मार्ग आणि पायधुनीतील तीन मंदिरातील चोरीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तिन्ही गुन्ह्यांतील चांदीचे दागिने आणि मूर्ती पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. व्यवसायात आलेल्या नुकसानीनंतर कपिल सोनी हा मंदिरात चोरी करु लागला होता. या चोरीच्या गुन्ह्यांत त्याला पहिल्यांदाच पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अटकेने इतर काही मंदिराच्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी सांगितले.

केतन नाथलाल डावडा हे 64 वर्षांचे तक्रारदार मलबार हिल येथे राहत असून त्यांचा टेक्सटाईल्सचा व्यवसाय होता. सध्या ते व्यवसायातून निवृत्त झाले आहेत. मंगलदास मार्केटच्या कपड्याच्या बॉम्बे क्लोथ मार्केट कंपनी लिमिटेडमध्ये ते बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून काम करतात. याच मार्केटमध्ये येण्याजाण्यासाठी एकूण सतरा गेट असून सर्व गेट सकाळी दहा वाजता उघडते आणि रात्री साडेआठ वाजता बंद होता. तिथे राम, सिता, लक्ष्मण, महादेव आणि संतोषी माताचे एकूण तीन छोटे मंदिर आहेत.

15 सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता ते त्यांच्या घरी होते. यावेळी मंगलदास मार्केटचा सुरक्षारक्षक राजेश शिवशंकर तिवारीने त्यांना फोन करुन महादेव मंदिरातील चांदीच्या धातूचे पाणी वाहण्याचे कलश आणि नागदेवताची चांदीची मूर्ती असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची माहिती सांगितली होती. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली होती. त्यामुळे त्यांनी मंदिरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली होती. यावेळी त्यांना अज्ञात व्यक्तीने सुमारे तीन लाखांचे कलश आणि मूर्ती चोरी केल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना ही माहिती सांगितली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता.

या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडारे, पोलीस हवालदार कांबळे, सानप, वाकचौरे यांनी तपास सुरु केला होता. मंदिरासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान या गुन्ह्यांतील आरोपी राजस्थानला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या पथकाने राजस्थानच्या जोधपूर येथून कपिल सोनी याला ताब्यात घेतले होते.

चौकशीत कपिल हा जोधपूरच्या भाद्धसिया मंदिर, अंबालाल ज्वेलर्स परिसरात राहतो. तो ज्वेलर्स व्यापारी असून त्याला व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे त्याने मंदिराला टार्गेट करुन तिथे चोरी करण्यास सुरुवात केली होती. मंदिराची रेकी केल्यानंतर तो तिथे बसून भाविक गेल्यानंतर संधी मिळताच चोरी करुन पळून जात होता. अटकेच्या भीतीने तो चोरीनंतर त्याच दिवशी राजस्थानला पळून जात होता. त्याने महादेव मंदिरासह इतर ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली होती.

याच गुन्ह्यांत अटक करुन त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर पुढील चौकशीसाठी आणण्यात आले. यावेळी त्याने एल. टी मार्ग आणि पायधुनीतील तीन मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या 2 किलो 210 ग्रॅम वजनाचे चांदी हस्तगत करण्यात आला. कपिल हा व्ही. रोड, जुहू, अंधेरी, डी. एन नगर, भोईवाडा परिसरात वावरताना सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे. या परिसरातील मंदिरात त्याने चोरी केली आहे का याचाही तपास सुरु आहे. त्याचा ताबा एल. टी मार्ग पोलिसाकडून पायधुनी पोलिसांना देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page