मांडुळ जातीच्या सापाची तस्करीप्रकरणी चौघांना अटक
जप्त केलेल्या सापाला वन अधिकार्यांच्या स्वाधीन केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – तेलंगणा येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या मांडुळ जातीच्या सापाची तस्करीप्रकरणी चारजणांच्या एका टोळीला कफ परेड पोलिसांनी अटक केली. नरसिंहा सत्यमा धोटी, शिवा मल्लेश आडप, रवी वसंत भोईर, अरविंद चौतुराम गुप्ता अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच किलो वजनाचा तसेच ५५ इंच लांबीचा मांडुळ जातीचा साप जप्त केला असून त्याला वन अधिकार्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मांडुळ जातीच्या दुर्मिळ सापाला देश-विदेशात प्रचंड मागणी असून या सापाची लाखो रुपयांना खरेदी-विक्री केली जात होते. अशाच मांडुळ जातीच्या सापाची विक्रीसाठी काहीजण कफ परेड परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत देवकर, पोलीस उपनिरीक्षक रुपेश भागवत यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत देवकर, अभिजीत भोसले, पोलीस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत, पोलीस हवालदार प्रशांत सावंत, प्रतोद नाईक, पोलीस शिपाई प्रविण यादव, मुरली चौधरी, प्रकाश बारी यांनी कफ परेड येथील मेकर टॉवरजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी तिथे एका पांढर्या रंगाच्या मारुती एर्टिंगा कारमधून चारजण आले होते. या चौघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी कारची झडती घेतल्यानंतर कारच्या मागील बाजूला ठेवलेल्या एका बॅगेतून पोलिसांनी मांडुळ जातीचे एक जिवंत साप जप्त केले. ५ किलो वजनाचा आणि ५५ इंच लांबीचा हा साप आहे.
तपासात नरसिंहा आणि शिवा हे दोघेही तेलंगणाच्या नालगौडा आणि यादरी परिसरातील रहिवाशी आहे. ते दोघेही मांडुळ जातीच्या सापाची मुंबई शहरात विक्रीसाठी आले होते. त्यासाठी त्यांना रवी भोईर आणि अरविंद गुप्ता हे मदत करत होते. सापाच्या विक्रीतून आलेल्या पैशांतून त्यांना काही रक्कम कमिशन म्हणून मिळणार होती. यातील रवी हा मुलुंड तर अरविंद हा मुंब्राचा रहिवाशी आहे. या चौघांविरुद्ध ३९ (३), ४४, ४८ (ए), ५१ वन्य जीव संरक्षण कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. हा साप नंतर सर्पमित्र गणेश गायकवाड यांच्या मदतीने वन परिक्षेत्र अधिकारी, ठाणे वन विभागाकडे सोपविण्यात आले होते.