अज्ञात महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेला यश
चरित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या करणार्या पतीसह दोघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2026
विरार, – दहा दिवसांपूर्वी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या एका अज्ञात महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले आहे. मृत महिलेची ओळख पटली असून तिचे नाव मधुबाला ऊर्फ प्रियाकुमारी रोशन यादव (23) असून तिच्या हत्येप्रकरणी तिच्या पतीसह त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली. ररोशन रामजग यादव आणि भानुप्रताप विजयबहादूर यादव अशी या दोघांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. चारित्र्याच्या संशयावरुन होणार्या वादातून रोशनने भानुप्रतापच्या मदतीने मधुबालाची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही मांडवी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी 21 मार्चला दुपारी बारा वाजता मौजे शिरवली गाव, वजेश्वरी ते शिरसाडकडे जाणार्या रमेश घरत यांच्या शेतातील जांभळाच्या झाडाजवळील गवतात पोलिसांना एक अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. 25 ते 30 वयोगटातील या महिलेचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे तिची ओळख पटली नव्हती. तिची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नव्हती. त्यामुळे या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. दुसर्या दिवशी त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात या महिलेची गळा कापून आणि नंतर डोक्यात जड वस्तूने मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघड होताच अज्ञात मारेकर्याविरुद्ध मांडवी पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी तसेच तिच्या मारेकर्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या घटनेची पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील, संतोष चव्हाण, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, गोविंद केंद्रे, सागर बारावकर, प्रशांत पाटील, राकेश पवार, इंद्रनील पाटील, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जाधव, मनोहर तारडे, आतिक पवार, तुषार दळवी, मसुब प्रविण वानखेडे, सागर सोनावणे यांनी तपास सुरु केला होता.
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, पालघर, नाशिक शहर आणि ग्रामीण तसेच उत्तरप्रदेशातील राज्यातील संबंधित वयोगटातील महिलेच्या मिसिंगची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. जवळपास पाचशेहून अधिक जास्त सीसीटिव्हीचे सलग 72 तास फुटेज तपासण्यात आले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी राकेशन यादव आणि भानुप्रताप यादव या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच त्या महिलेची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. मृत महिलेचे नाव मधुबाला ऊर्फ प्रियाकुमारी असून ती रोशन यादवची पत्नी होती. राकेशन हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरुन त्यांच्यात सतत खटके उडत होते. त्यातून त्याने तिला कायमचे संपविण्याची योजना बनविली होती.
याकामी त्याने त्याचा सहकारी भानुप्रतापची मदत घेतली होती. 15 मार्चला रोशन मधुबाला हिला उत्तरप्रदेशातून नालासोपारा येथे घेऊन आला होता. त्यानंतर या दोघांनी बाईकवरुन घटनास्थळी आणले होते, तिथेच त्यांनी तिची हत्या करुन तिचा मृतदेह गवतात फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. रोशन आणि भानुप्रताप हे दोघेही उत्तरप्रदेशच्या आजमगढचे रहिवाशी असून सध्या नालासोपारा येथील अमीत डेअरीजवळील जगदीश चाळ तर नगीनदास पाडा परिसरात राहत होते. अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मांडवी पोलिसांकडे सोपविण्यात आले.
या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. कुठलाही पुरावा नसताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अज्ञात महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करुन हत्येतील दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्याचे पोलीस आयुक्त निकेश कौशिक यांनी कौतुक केले होते.