जेसीबीच्या धडकेने बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

अपघातानंतर पळालेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 जून 2025
मुंबई, – समोरुन येणार्‍या एका जेसीबीच्या धडकेने बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. रविकांत सिंग लोधी असे या मृत बाईकस्वाराचे नाव असून त्याचा मित्र अभय रामदास गुप्ता हा जखमी झाला. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी जेसीबी चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

हा अपघात रविवारी पावणेतीन वाजता मानखुर्द येथील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, बैंगनवाडीकडे जाणार्‍या दक्षिण वाहिनीवर झाला. अभय गुप्ता ऊर्फ लकी हा मानखुर्द येथील मंडाळा, इंदिरानगरचा रहिवाशी आहे. रविकांत हा त्याचा मित्र असून रविवारी रात्री पावणेतीन वाजता ते दोघेही गोवंडीतील बैगनवाडी परिसरात काही कामानिमित्त आले होते. यावेळी रविकांत हा बाईक चालवत होता तर अभय हा त्याच्या मागे बसला होता. ही बाईक बैंगनवाडीकडे जाणार्‍या दक्षिण वाहिनीवरुन जात असताना समोरुन येणार्‍या जेसीबी चालकाने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात ते दोघेही जखमी झाले होते.

अपघातानतर जेसीबी चालक त्यांना वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोघांनाही तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे रविकांतला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर अभय गुप्ता याला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून दिले होते. याप्रकरणी अभय गुप्ता याच्या जबानीवरुन मानखुर्द पोलिसांनी हलगर्जीपणाने जेसीबी चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस तर दुसर्‍याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चालक जेसीबी तिथे टाकून पळून गेल्यान त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page