मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जुलै 2025
मुंबई, – कॉलेजच्या ट्रिपसाठी रायगड किल्ले येथे जाण्यासाठी निघालेल्या बाईकला मागून येणार्या डंपरची धडक लागून झालेल्या अपघातात हसन अमीरुल्लाह इंद्रीसी या 19 वर्षांच्या कॉलेज तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
हा अपघात शनिवारी सकाळी सव्वासात वाजता मानखुर्द येथील टाटा हाऊससमोरील वाशीकडे जाणार्या रस्त्यावर झाला. अशरफ अन्वर शेख हा गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहत असून चेंबूरच्या गुरु कॉमर्स कॉलेजमध्ये बीएससीडीएसचे शिक्षण घेतो. त्याचे आई-वडिल बिहारच्या गावी राहत असून तिथे त्यांचा टोपी बनविण्याचा कारखाना आहे. हसन हा त्याचाच कॉलेजमध्ये शिकत असून असून ते दोघेही चांगले मित्र आहेत. त्यांच्या कॉलेजची दरवर्षी ट्रेकिंग ट्रिप जाते. त्यासाठी आधीपासून रजिस्ट्रेशन कराव लागते.
12 जुलैला कॉलेजतर्फे रायगड किल्ले ब्रेकिंग ट्रिप जाणार होती. त्यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन करता आले नाही, त्यामुळे त्यांना अॅडमिशन मिळाले नव्हते. तरीही त्यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी सकाळी ते त्यांच्या बाईकवरुन रायगड किल्ले ट्रिपसाठी घरातून निघाले होते. त्यांच्यासह त्यांचे इतर मित्रही त्यांच्या बाईकवरुन ट्रिपसाठी येणार होते. त्यांची बाईक मानखुर्द टी जंक्शनहून टाटा पावर हाऊससमोरुन वाशीकडे जाणार्या रस्त्यावरुन जात होती.
याच दरम्यान मागून भरवेगात आलेल्या एका डंपरने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. या अपघातात त्यांची बाईक स्लीप होऊन ते दोघेही खाली पडले. याच दरम्यान हसनच्या डोक्यावरुन आणि छातीवरुन डंपरचे चाक गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघातानंतर डंपरचालक त्यांना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती न देता तेथून पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच काही वेळानंतर तिथे मानखुर्द पोलीस आले होते.
जखमी झालेल्या हसनला पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात अशरफला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्यावर तिथे प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दुसर्याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.