मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जुलै 2025
मुंबई, – मानखुर्दच्या जकात नाक्यामागे बंद पडलेली कार पाहत असताना भरवेगात जाणार्या एका वॅगनार कारच्या धडकेने प्रिटींग प्रेसमध्ये चालक म्हणून काम करणार्या 40 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तेजस बळीराम बागुल असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी कारचालक साईरुल अल्लाउद्दीन इस्लाम याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
हा अपघात सोमवारी पहाटे चार वाजता मानखुर्द येथील सायन-पनवेल हायवेवरील वाशीकडे जाणार्या जकात नाक्यामागे झाला. तेजस हा घाटकोपरच्या विद्याविहार तर त्याचा लहान भाऊ तुषार बागुल हा भांडुप येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. बागुल कुटुंबिय हे मूळचे रायगडचे रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास होते. तेजस हा टाईम्स ऑफ इंडियाच्या कांदिवलीतील प्रिटींग प्रेसमध्ये डिलीव्हरीच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो. सकाळी तो कांदिवली येथून प्रिटींग प्रेसमधून पेपर घेऊन डिलीव्हरीसाठी नवी मुंबईतील खारघर, कामोठे येथे जात होता.
सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. यावेळी जकात नाक्यामागे एक कार बंद पडली होती. त्यामुळे तो तिथे कार पाहत असताना अचानक मागून येणार्या एका वॅगनार कारने त्याला जोरात धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तुषार बागुल याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक साईरुल इस्लाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.