लाडकी बहिण योजनेच्या नावाने आयफोनसाठी कर्ज काढून फसवणुक
65 लोकांकडून घेतलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2025
मुंबई, – राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेचा फायदा मिळवून देतो अशी बतावणी करुन 65 जणांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून घेतलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करुन आयफोनसाठी कर्ज काढून वित्त पुरवठा करणार्या एका खाजगी कंपनीची सुमारे वीस लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्द परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. सुमीत गायकवाड, राजू बोराडे, रोशन दानिश आणि शाहरुख अशी या पाचजणांची नावे आहेत. अशा प्रकारे फसवणुक करणारी एक सराईत टोळी असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या टोळीने फसवणुक झालेल्या 65 जणांना अंधेरी आणि कुर्ला येथील आय व्हिनस अॅपल स्टोरमध्ये आणून त्यांच्या हातात आयफोन देऊन फोटो काढले. लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता म्हणून अडीच हजार रुपये देऊन पुढील हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे आश्वासन देऊन त्यांच्यासह वित्त पुरवठा करणार्या कंपनीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
आकाश सुदेश ढमाळ हा कुर्ला येथे राहत असून एका अर्थपुरवठा करणार्या खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्यांच्या कंपनीचे ठाण्यातील नेहरुनगर, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, कृषी कार्यालयात मुख्य कार्यालय आहे. त्याच्या विभागात फसवणुकीचे केसेस आणि त्यावर नियंत्रण करण्याचे काम केले जाते. ही कंपनीत त्यांच्या ग्राहकांना विविध घरगुती वापराच्या वस्तूल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल खरेदीसाठी वित्त पुरविते. त्यासाठी कंपनीचे काही प्रतिनिधी विवधि शॉप, मॉलमध्य काम करतात. ग्राहकांकडून मिळालेल्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर त्यांच्या गरजेनुसार त्यांना कंपनीकडून कर्ज दिले जाते. त्यासाठी ग्राहकाला आधी संबंधित वस्तूसाठी डाऊन पेमेंट करावे लागते. त्यानंतर त्यांना कंपनीकडून उर्वरित रक्कमेचे कर्ज दिले जाते. नोव्हेंबर 2024 रोजी कंपनीने 65 ग्राहकांना कर्ज दिले होते, मात्र या ग्राहकांनी कर्जाचे नियमित हप्ते भरले नव्हते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली होती.
संबंधित 65 ग्राहकांची भेट घेतल्यानंतर या टिमला त्यांनी शंकर घाडगे, पद्मा कांबळे, सुलोचना दिवानजी, सोनल नांदगावकर यांनी त्याचे सहकारी सुमीत गायकवाड याच्या मदतीने त्यांना शासनाच्या लाडक्या बहिण या योजनेतंर्गत पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून कुर्ला आणि अंधेरी येथील आय व्हिनस अॅपल स्टोर या मोबाईल दुकानात नेले होते. तिथे त्यांच्याकडून त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर कागदपत्रे घेतली होती. तसेच दुकानातून आय फोन खरेदी करुन आमच्या हातात आयफोन देऊन त्याचे फोटो काढले होते. त्यानंतर ते आयफोन स्वतकडे ठेवले होते. त्यांनतर प्रत्येकी अडीच हजार रुपये दिल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. या सर्वांना लाडक्या बहिणीचा हा पहिला हप्ता असल्याचे सांगून पुढील हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले.
चौकशीअंती 4 एप्रिल ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीत या सर्वांना मानखुर्द येथील साठेनगर, मांगीरबाबा मंदिराजवळील साईबाबा आदर्श चाळीत एकत्र बोलाविण्यात आले. तिथे त्यांना लाडक्या बहिणीची माहिती देऊन त्यांच्याकडे त्यांचे कागदपत्रे घेण्यात आले होते. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करुन कंपनीत आयफोनसाठी कर्ज काढले होते. मात्र आयफोन संबंधित ग्राहकांना न देता त्याचा परस्पर अपहार केला होता. या कर्जाचे नियमित हप्ते न भरता कंपनीची फसवणुक केली होती. अशा प्रकारे या टोळीने 20 लाख सात हजार 402 रुपयांच्या कर्जाचा अपहार करुन ही फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने आकाश ढमाळ यांनी मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुमीत गायकवाड, राजू बोराडे, रोशन दानिश आणि शाहरुख या पाचजणांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या पाचही आरोपींचा शोध सुरु आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही सराईत टोळी असून याकामी त्यांना इतर काही आरोपींनी मदत केल्याचे बोलले जाते.