एका रुमसाठी पाचजणांकडून घेतलेल्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार

दहा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2026
मुंबई, – मानखुर्दच्या मंडाळा परिसरात असलेल्या एका रुमसाठी पाचजणांकडून घेतलेल्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अफसानाबानो अब्दुल कादिर खान या रुम मालकिण असलेल्या महिलेविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तिच्याविरुद्ध आतापर्यंत पाचजणांची पोलिसांनी तक्रार केली असून तिने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

शाहिद सत्तार खान हा मानखुर्दच्या मंडाळा परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याला हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने एक रुम हवा होता, त्यासाठी त्याने त्याच्या एका मित्राला सांगितले होते. जून 2024 रोजी त्याने त्याला मानखुर्द येथील मंडाळा, दुर्गा माता मंदिराजवळील यशवंतराव चव्हाण नगरात आणले होते. तिथेच अफसानाबानो ही महिला राहत होती. तिच्या मालकीचा तिथे एक रुम होता, तिला तो रुम हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा होता. तिची भेट घेतल्यांनतर त्याने तिच्याशी हेव्ही डिपॉझिटबाबत सविस्तर चर्चा केली होती. चर्चेअंती त्यांच्या दोन लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर रुम देण्याचे ठरले होते.

ठरल्याप्रमाणे त्याने तिला दोन लाख रुपये दिले होते. त्यांनतर त्यांच्यात भाडे करारनामा झाला होता. यावेळी अफसानाबानोने तिच्या मुलीचे लग्न होणार असून तोपर्यंत रुम तिच्याकडे राहू द्या. त्यामोबदल्यात तिने त्यांना सात हजार रुपये भाडे देण्याचे मान्य केले होते. आठ महिने तिने त्याला नियमित सात हजार रुपये भाडे दिले होते, मात्र नंतर तिने भाडे देणे बंद केले होते. त्यामुळे त्याने तिच्याकडे विचारणा करुन रुमचा ताबा किंवा हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कम परत करा असे सांगितले. मात्र तिने त्याला भाडे किंवा हेव्ही डिपॉझिटची रक्कम दिली नाही.

तिच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात शाहिदने तिच्याविरुद्ध मानुखर्द पोलिसांत तक्रार केली होती. यावेळी त्याला अफसानाबानो हिने त्याच्यासह किस्मती खातून मोहम्मद अक्रम मंसुरी, हमीदा खातून अन्वर हुसैन शाह यांच्याकडून प्रत्येकी एक लाख, मोहम्मद सलीम अहमद अन्सारी, सिराज अहमद अन्सारी आणि रेश्मा राजेश गुप्ता यांच्याकडून प्रत्येकी दोन अशा प्रकारे एका रुमसाठी पाचजणांकडून दहा लाख रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतले होते.

मात्र कोणालाही रुमचा ताबा तसेच हेव्ही डिपॉझिटची रक्कम न देता त्यांची फसवणुक केली होती. एकाच वेळेस पाचजणांकडून अफसानाबानो खानविरोधात तक्रार प्राप्त झाली होती. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तिच्याविरुद्ध ठोस कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशांनतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन पाचजणांची दहा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुर असून लवकरच तिची पोलिसांची चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page