पूर्ववैमस्नातून मानुखर्द येथे गोळीबाराची घटनेने तणाव
गोळीबारात कोणीही जखमी नाही; तिघांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पूर्ववैमस्नातून मानखुर्द येथे गुरुवारी रात्री गोळीबाराच्या घटनेने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाला नाही. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यात सोहेल सय्यद, राहुल सोहेल सय्यद आणि सोहेलचा मेहुणा कार्तिक यांचा समावेश आहे. पळून गेलेल्या या तिघांना मानखुर्द पोलिसांनी चौकशीसाठी ताब्या घेतल्याचे बोलले जाते.
बाबू अहमद खलील अहमद अन्सारी हा बिगारी कामगार असून तो नवी मुंबईतील उलवे, देवी माता मंदिराजवळील रेल्वे ब्रिजजवळ राहतो. पूर्वी तो मानखुर्द येथील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात राहत होता. त्यामुळे तो आरोपीच्या परिचित असून त्यांच्यात पूर्वीचा जुना वाद होता. गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजता बाबू हा त्याचा शेजारी राहणारा मुद्दशीर जावेद शेख याच्या अत्यंविधीसाठी मानखुर्द परिसरात आला होता. यावेळी पूर्ववैमस्नातून सोहेलने त्याचा मुलगा राहुलला देशी बनावटीचे पिस्तूल देऊन बाबूवर गोळीबार करण्यास सांगितले. त्यामुळे त्याने त्याच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तूलमधून गोळी सुटली नाही. बाबूला आज जिवंत सोडायचे नाही असे सांगून कार्तिक आणि सोहेल याने त्याला पुन्हा गोळी झाडण्यास सांगितले. त्यामुळे त्याने पुन्हा त्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुलची आत्याची आई राणी हिने मध्यस्थी करुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिस्तूलमधून एक गोळी सुटली होती. अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गोळीबाराची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत तिन्ही आरोपी तेथून पळून गेले होते. याप्रकरणी बाबू अन्सारीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोहेल सय्यद, राहुल सय्यद आणि कार्तिक या तिघांविरुद्ध १०९, ३५१ (३), ३५२, ६१ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ३, २७ भारतीय हत्यार कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासात तीन महिन्यांत सय्यद कुटुंबियांसोबत बाबूशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्याचा त्यांना प्रचंड राग होता. बाबूच्या हत्येच्या उद्देशाने त्यांनी पिस्तूलमधून त्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐन वेळेस पिस्तूल लॉक झाले होते. पळून गेलेल्या तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे बोलले जाते.