मामाने अल्पवयीन भाचीवर मित्रांना लैगिंक अत्याचारास प्रवृत्त केले
मानखुर्द येथील घटना; दोन्ही आरोपी मित्रांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जून २०२४
मुंबई, – मामाने सोळा वर्षांच्या अल्पवयीन भाचीवर दोन मित्रांना जबदस्तीने लैगिंक अत्याचार करण्यास प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आरोपी मामासह दोन्ही मित्रांविरुद्ध भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे तर मामा पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
३७ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द परिसरात राहत असून ती घरकाम करते. तिला सोळा वर्षांची मुलगी आहे तर पाहिजे आरोपी तिचा भाऊ आहे. सहा महिन्यापूर्वी ही मुलगी तिच्या घरी होती. यावेळी त्यांच्या घरी तिच्या मामासोबत त्याचा एक मित्र आला होता. दुपारी दिड वाजता घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने त्याच्या अल्पवयीन भाचीला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले होते. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर एक आठवड्याने मामाने दुसर्या मित्राला घरी आणून तिला तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्यास प्रवृत्त केले होते. अशा प्रकारे त्याने घरात कोणीही नसताना मामाने दोन वेळेस दोन मित्रांना तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करुन तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. काही दिवसांपूर्वी तिला पोटात दुखू लागले होते. त्यामुळे तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले होते. तिथे मेडीकल चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी तिला तिची मुलगी गरोदर असल्याचे सांगितले. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने तिची आपुलकीने विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता.
या घटनेनंतर तिने तिला मानखुर्द पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेा प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मामासह दोन्ही आरोपी मित्रांविरुद्ध ३७६, ३७६ (३), ३७६ (डी), ३७६ (२), (एफ), ३२३, ५०६ (२), ३४ भादवी सहकलम ४, ६, ८, १०, १२, १७ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर काही तासांत दोन्ही आरोपी मित्रांना मानखुर्द येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत आरोपी मामाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.