मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – अश्लील व्हिडीओ दाखवून बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका २२ वर्षांच्या तरुणाला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. प्रकाश असे या आरोपीचे नाव असून बळीत मुलीच्या मागच्या गल्लीत राहतो. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
३५ वर्षांची तक्रारदार महिला ही मानखुर्द येथे राहत असून याच परिसरात आरोपी राहतो. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. २५ सप्टेंबरला तिच्या बारा वर्षांची मुलीशी प्रकाशने अश्लील चाळे केले होते. ती एकटी असल्याचा फायदा घेऊन त्याने तिची ओढणी खेचून तिला कमरेला चिमटा काढला. त्यानंतर तिला तो सतत अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग करत होता. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरुच होता. हा प्रकार या मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने मानखुर्द पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल आरोपीविरुद्घ विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने बळीत मुलीचा विनयभंग करुन तिला मोबाईलवरुन काही अश्लील व्हिडीओ दाखविल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.