मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मानखुर्द येथे दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा त्यांच्याच परिचित आरोपीने घरात घुसून अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 38 वर्षांच्या आरोपीविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
32 वर्षांची तक्रारदार महिला ही मानखुर्द परिसरात राहत असून ती सुरक्षारक्षक म्हणून काम करते. बळीत ही तिची दहा वर्षांची मुलगी असून ती सध्या तेथील एका शाळेत शिकते. रविवारी ही महिला नेहमीप्रमाणे तिच्या कामासाठी निघून गेली होती. यावेळी तिची मुलगी तिच्या दहा वर्षांच्या मैत्रिणीसोबत घरातच खेळत होती. काही वेळाने तिथेच राहणारा आरोपी तिथे आला आणि त्याने घरात प्रवेश करुन आतून कडी लावली होती. काही वेळानंतर त्याने दोन्ही मुलींशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
त्यांच्या छाती आणि पाठीवरुन नकोसा स्पर्श करुन त्यांचा विनयभंग केला होता. दोन्ही मुलींशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो घरातून पळून गेला. कामावरुन घरी आलेल्या तक्रारदार महिलेला मुलीकडून हा प्रकार समजताच तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने मानखुर्द पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपीचा त्याच्या घरासह परिसरात पोलिसांनी शोध घेतला होता. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.