मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ एप्रिल २०२४
मुंबई, – आजारी दिड वर्षांच्या मुलाची त्याच्याच पित्याने जमिनीवर जोरात आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात घडली. आफान इम्रान अन्सारी असे मृत मुलाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी आरोपी पिता इम्रान अनिस अन्सारी याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर इम्रानला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता मानखुर्द येथील साठेनगर, डब्बा कंपनीजवळील झोपडपट्टीत घडली. सकिना इम्रान अन्सारी ही महिला मूळची बिहारच्या मधुबनीची रहिवाशी असून सध्या तिचे पती इम्रान, पाच वर्षांचा मुलगा गुफरान, दिड वर्षांचा मुलगा आफानसोबत साठेनगरात राहते. ती भिक्षेकरु असून तिचा पती विविध रुग्णालयात जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करतो. इम्रानला दारु पिण्याचे व्यसन असून तो अनेकदा मद्यप्राशन करुन कामावर जाण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे घर चालविण्यासाठी ती भिक मागत होती. तिचा मुलगा आफान याला जन्मापासून किडनीचा आजार होता. त्याच्या किडणीला सूज असल्याने तो सतत आजारी पडत होता. काही दिवसांपूर्वी त्याला उलट्या आणि जुलाब होत असल्याने त्याला जवळच्या अण्णाभाऊ साठे नगर, सोरटनाकाजवळील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच्या आजारामुळे तसेच उपचारावर होणार्या खर्चामुळे तिचे तिच्या पतीसोबत नेहमीच खटके उडत होते. शुक्रवारी १२ एप्रिलला इम्रान हा नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुन घरी आला होता. यावेळी त्याचे सकिनासोबत क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर सायंकाळी सहा वाजता त्याने विषारी किटकनाशक प्राशन केले होते. मात्र ते किटकनाशक प्राशन करुनही त्याला काहीच झाले नाही. त्यामुळे तो घरातून निघून गेला. साडेसात वाजता भूक लागल्याने तो पुन्हा घरी आला.
काही वेळानंतर त्याने आफानला उचलून जमिनीवर जोरात आपटले. हा प्रकार निर्दशनास येताच तिने त्याच्याकडून आफानला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळानंतर त्याचा रडण्याचा आवाज बंद झाला. त्याच्या नाकातून फेस येत असल्याने तिने त्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती रुग्णालयातून मानखुर्द पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी सकिनाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी इम्रानविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.