मानखुर्द येथे अज्ञात महिलेच्या हत्येने खळबळ

मृतदेह गोणीत भरुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मानखुर्द येथे एका अज्ञात महिलेच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या महिलेची ओळख पटली नसून तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका प्लास्टिक गोणीत भरुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा मारेकर्‍याने प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून अज्ञात मारेकर्‍याचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारीही करत आहेत.

मानखुर्दच्या महाराष्टनगर परिसरात मेट्रो दोन या मार्गाच्या कारशेडचे काम सुरु आहे. त्यामुळे तिथे खोदकाम करण्यात आले होते. खोदकामासाठी मातीचा ढिगारा जमा झालाह होता. शुक्रंवारी तिथे दुर्गंधी येत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. यावेळी मातीच्या ढिगार्‍याजवळ एक गोणी पडली होती, याच गोणीत दुर्गंधी येत होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला देण्यात आली होती. कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गोणी उघडून पाहिल्यानंतर त्यात एका महिलेचा मृतदेह दिसून आला. प्राथमिक तपासात या महिलेची हत्या करुन तिच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका गोणीत भरुन तिथे टाकून मारेकर्‍यांनी पलायन केल्याचे उघडकीस आले. पंचनामा केल्यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. तिच्या अंगावर काही इमिटेशन ज्वेलरी होती. तिने अंगावर सलवार कुर्ता घातला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे तिची हत्या तीन ते चार दिवसांपूर्वीच झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन मारेकर्‍यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page