पोलिसात तक्रार केली म्हणून कापड व्यावसायिकावर हल्ला
मानखुर्द येथील घटना; गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पोलिसात पोक्सोची तक्रार केली म्हणून सलमान खुद्दुस खान या २७ वर्षांच्या कापड व्यावसायिकावर त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने भोसकून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सलमान हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सुनिल शंकर खडसे या आरोपीस मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मंगळवारी ३० जुलैला रात्री दहा वाजता मानखुर्द येथील हिरानंदानी आकृती इमारत क्रमांक पाचमध्ये घडली. सलमान हा मानखुर्दया लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी परिसरात राहत असून त्याचा स्वतचा कपड्याचा व्यवसाय आहे. समीर सुल्तान शेख हा त्याचा चुलत भाऊ असून मंगळवारी रात्री तो त्याच्याच घरी जेवणासाठी जात होता. यावेळी तिथे सुनिल आला. त्याने त्याला अडवून त्याच्या भावाने त्याच्याविरुद्ध पोलिसात पोक्सोची तक्रार केली आहे. त्याला जास्त मस्ती आली आहे. ही मस्ती उतरायला जास्त वेळ लागणार नाही. तुमच्या दोन्ही भावाची हत्या करायला मला वेळ लागणार नाही अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यानंतर त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने सलमानच्या छातीत भोसकले. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर सुनिल तेथून पळून गेला.
हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी जखमी झालेल्या सलमानला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सलमानच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सुनिलविरुद्ध १०९, ३५१ (२), १२६ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुनिलचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला बुधवारी मानखूर्द येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.