प्रेयसीसोबत बोलतो म्हणून तरुणावर तलवारीसह बांबूने हल्ला
तिघांना अटक तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – प्रेयसीसोबत बोलतो म्हणून एका तरुणावर चारजणांच्या टोळीने तलवारीसह बांबू हल्ला करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात युनूस नावाचा तरुण गंभीरररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या तिन्ही हल्लेखोर आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद शहबाग ऊर्फ मुन्ना अनिस खान, समीन मेहबूब खान आणि अशरफ अली रजाऊल मुस्तका अशी या तिघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अटक केलेल्या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे.
५४ वर्षांचे तक्रारदार मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, गल्ली क्रमांक पाचच्या इंदिरानगर परिसरात राहत असून त्यांचा बॅनर बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा युनूस नावाचा एक मुलगा आहे. बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजता युनूस हा त्याचे मित्र लंद्दन आणि मोहम्मद यांच्यासोबत महाराष्ट्रनगर, गोशाळेजवळ गप्पा मारत होते. याच दरम्यान तिथे चारही आरोपी आले. यावेळी त्यांनी युनूसला मुन्नाच्या प्रेयसीशी नेहमी का बोलतोस, तिच्यापासून लांब रहा असे सांगून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. या वादानंतर या चौघांनी त्याच्यावर तलवारीसह बांबूने प्राणघातक हल्ला केला तर इतर दोघांनी त्याला हातासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात युनूस हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला, हाताला आणि मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जाते. ही माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
हा प्रकार युनूसच्या वडिलांकडून समजताच त्यांच्या जबानीवरुन पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच मोहम्मद शहबाग, समीन खान आणि अशरफ मुस्तका या तिघांसह एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर तिघांना पोलिसांनी अटक केली तर अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले होते. अटकेनंतर तिन्ही आरोपींना शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.