मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – चालताना धक्का लागला म्हणून मोहम्मद बिलाल मुबारक शेख या १८ वर्षांच्या तरुणावर दोघांनी बांबूसह पेव्हर ब्लॉकने प्राणघातक हल्ला केला. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोहम्मद बिलालला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या रोहित अंबू देवर ऊर्फ मॅक्सी याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली तर दुसर्याचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर रोहितला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी पहाटे चार वाजता मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ घडली. मोहम्मद बिलाल हा नवी मुंबईतील नेरुळचा रहिवाशी असून तो सध्या काहीच कामधंदा करत नाही. सोमवारी तो मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरातून जात होता. चालताना त्याचा आरोपीला धक्का लागला होता. याच कारणावरुन दोन्ही आरोपीने त्याच्यावर लाकडी बांबूसह मोठ्या पेव्हर ब्लॉकने बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रिक्षात बसवून त्यांनी रिक्षाचालकाला त्याला कुठेतरी सोडून देण्यास सांगितले. या प्रकाराने रिक्षाचालक प्रचंड घाबरला आणि त्याने काही अंतरावर त्याला टाकून तेथून पलायन केले. ही माहिती मिळताच मानुखर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या मोहम्मद बिलाल सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केल. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर तिथे उपचार सुरु आहे.
याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रोहित देवर याला त्याच्या मानखुर्द येथील गणेश चाळीतील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. रोहित हा न्युरो हॉस्पिटलमध्ये केअरटेकर म्हणून कामाला असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.