मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारला तरुणावर हल्ला
पळून गेलेल्या तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून मोहम्मद शकील अब्दुल रजाक शेख या 22 वर्षांच्या तरुणावर तिघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात मोहम्मद शकीलला दुखापत झाली असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी राहुल यादव ऊर्फ माथाडी, सुरज आणि इम्रान ऊर्फ इम्मू या तिघांविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनी, जनकल्याण सोसायटीमध्ये मोहम्मद शकील राहतो. दोन दिवसांपूर्वी त्याचा मुलगा शाबान याला राहुल यादवने विनाकारण मारहाण केली होती. हा प्रकार मुलाकडून समजताच मोहम्मद शकील राहुलला मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेला होता. यावेळी एकवीरा हॉटेलसमोर राहुलसह त्याच्या दोन सहकार्याने मोहम्मद शकीलवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
प्राथमिक औषधोपचार त्याला घरी पाठविण्यात आले. या घटनेनंतर मोहम्मद शकीलने तिन्ही आरोपीविरुद्ध मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राहुल यादव, सुरज आणि इम्रान या तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर ते तिघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.