झोपत नाही म्हणून पाच वर्षांच्या मुलीला सिगारेटचे चटके
प्राणीमित्राच्या तक्रारीवरुन आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – झोपत नाही म्हणून पाच वर्षांच्या स्वतच्याच अल्पवयीन मुलीला तिच्या पित्याने मारहाण करुन सिगारेटचे चटके दिल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका प्राणीमित्राच्या तक्रारीवरुन मानखुर्द पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अब्दुल हकीम कयुम शेख हे प्राणीमित्र असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द येथे राहतात. सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता ते त्यांच्या दोन्ही मुलींना देवनार येथील शाळेत आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या पत्नी रुक्सारने त्यांना एक व्हिडीओ पाठविला होता. त्यामुळे त्यांनी तो व्हिडीओ पाहिला. तो व्हिडीओ त्याच परिसरात राहणार्या भगवान व्यक्तीचा होता. त्याला पाच वर्षांची एक मुलगी आहे. व्हिडीओमध्ये भगवान हा त्याच्या मुलीच्या पायाला बांधून मारहाण करत असल्याचे दिसून आले.
हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी ही माहिती मानखुर्द पोलिसांना देऊन आरोपी पित्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेत भगवान याला त्याच्या घरी जाऊन चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याची मुलगी झोपत नव्हती. त्याचा भगवानला प्रचंड राग आला आणि त्याने तिला बेदम मारहाण करुन तिला सिगारेटचे चटके दिले होते. तिच्या शरीरावर सिगारेट चटके असल्याचे दिसून आले.
या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. सोमवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.