1.12 कोटीच्या एमडी ड्रग्जसहीत विदेशी नागरिकाला अटक
ड्रग्ज विक्रीपूर्वीच दिड किलो एमडीसह घेतले ताब्यात
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मानपाडा, – एमडी ड्रग्जच्या डिलीव्हरीसाठी आलेल्या एका विदेशी नागरिकाला मानपाडा पोलिसांनी अटक केली. इसा बकायोका असे या 37 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी दिड किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत एक कोटी बारा लाख रुपये इतकी किंमत आहे. ड्रग्ज विक्रीसाठी तो निळजे गावाजवळ आला, मात्र विक्रीपूर्वीच त्याला दिड किलो एमडी ड्रग्जसहीत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
निळजे गाव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर काहीजण ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण, अजय कुंभार, पोलीस हवालदार पाटील, माळी, राठोड, पोलीस शिपाई आडे, गरुड, झांझुर्णे, चौधर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
सोमवारी रात्री पावणेअकरा वाजता इसा बकायोका आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्यात या अधिकार्यांना दिड कोलो एमडी ड्रग्जचा साठा सापडला. त्याची किंमत दोन कोटी बारा लाख रुपये इतकी आहे. चौकशीत त्याने एमडी ड्रग्जची विक्रीसाठी आल्याचे सांगितले. इसा हा इवोरी कोस्टचा नागरिक असून सध्या डोबिंवली परिसरात राहतो. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच पथकाने फरहान ऊर्फ मोहम्मद राहिब सलीम शेख या आरोपीस अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी एक चोरीची कारसह मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा जप्त केलाद आहे. फरहान हा एमडी ड्रग्ज तस्करीचा एक मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.