ज्वेलर्स व्यापार्‍याच्या मुलाला मारहाण आणि पाच कोटीची खंडणी

मनसे पदाधिकारी अविनाश जाधव यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मे २०२४
मुंबई, – आर्थिक वादातून मित्रासाठी झव्हेरी बाजार येथे गेलेल्या मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव यांनी एका ज्वेलर्स व्यापार्‍याच्या मुलाला दुखापत करुन मारहाण करुन व्यापार्‍याकडून पाच कोटीची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऐन लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर अविनाश जाधव यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. राजकीय हेतून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

यातील शैलेश जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मरिनड्राईव्ह परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे झव्हेरी बाजार येथे सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. शैलेश जैन आणि वैभव ठक्कर हे दोघेही एकमेकांच्या परिचित असून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी शैलेशने वैभवला झव्हेरी बाजार येथील जे. के ज्वेलर्स दुकानात बोलाविले होते. काही वेळानंतर तिथे अविनाश जाधव हे त्यांच्या अंगरक्षक, चालक आणि पाच ते सहा कार्यकर्त्यांसोबत आले होते. यावेळी त्यांच्यात याच व्यवहारातून वाद झालाअ ाणि त्यांनी पोलिसांच्या समोरच शैलेश जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण करुन दुखापतसह नुकसान करण्याची धमकी दिली होती. आर्थिक तोडगा काढण्याच्या बहाण्याने अविनाश जाधव यांनी त्यांच्याकडे पाच कोटीची खंडणीची मागणी केली होती असा आरोपच शैलेश जैन यांनी पोलिसांत केली होती. या तक्रारीनंतर अविनाश जाधवसह तिघांविरुद्ध पोलिसांनी कट रचून खंडणीची मागणी करणे तसेच अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दुसरीकडे वैभव ठक्करने शैलेश जैन यांनी आर्थिक वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावून त्यांना दुकानात डांबून ठेवले होते. त्यामुळे त्यांनी अविनाश जाधव यांना तिथे बोलाविले होते. या माहितीनंतर अविनाश जाधव हे एल. टी मार्ग पोलिसांसह तिथे गेले होते. सुरुवातीला सुरक्षारक्षकांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी त्यांना दरवाजा उघडण्यास सांगितल्यानंतर ते सर्वजण आतमध्ये गेले. यावेळी त्यांनी वैभव ठक्करची सुटका केली. याच दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार ऐकून घेतली असून क्रॉस तक्रार घेतली आहे. या गुन्ह्यांचा तपास ुसरु असून दोषी व्यक्तीविरुद्ध ठोस कारवाई केली जाईल असे सांगितले. राजकीय हेतून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचा आरोप यावेळी अविनाश जाधव यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page