नोकरीच्या आमिषाने महिलेची पावणेपाच लाखांची फसवणुक
मंत्रालयातील तोतया कर्मचार्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२४
मुंबई, – नोकरीच्या आमिषाने एका ४५ वर्षांच्या महिलेची दोन ठगांनी सुमारे पावणेपाच लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अरविंद पांडुरंग पवार आणि विलास गोपाळ गमरे या दोन्ही ठगाविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारचे इतर काही गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी एका गुन्ह्यांत दोघांनाही मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर ते दोघेही पळून गेले आहे. त्यामुळे या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सुचिता राजू चव्हाण ही महिला भांडुप येथे राहत असून ती बेरोजगार आहे. नोकरीची गरज असल्याने तिने तिच्या परिचित लोकांना नोकरीबाबत विचारणा केली होती. दोन वर्षांपूर्वी तिला तिच्या एका परिचित व्यक्तीने मंत्रालयात आरोग्य विभागात लिपीक पदावर नोकरी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी ती इच्छुक असल्याने तिच्या सूनेचे सरकारी करणारा विलास गमरे हा त्यांच्या परिचित आहे असे सांगितले होते. त्यामुळे ११ जुलै २०२२ रोजी ती तिच्या पतीसोबत विलासला भेटण्यासाठी मंत्रालयात गेली होती. तिथेच तिथे विलासोबत भेट झाली होती. त्याने तिला लिपीक पदासाठी मराठी टायपिंगची गरज असल्याचे सांगून नोकरीसाठी कमिशन म्हणून तो दोन लाख रुपये घेणार असल्याचे सांगितले. सरकारी नोकरी मिळत असल्याने तिने त्याला पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे तिने त्याला दोन लाखांसह तिचे वैयक्तिक कागदपत्रे दिली होती. त्यानंतर तिने सप्टेंबर महिन्यांत टायपिंगचा क्लास सुरु केला होता. ऑक्टोंबर २०२२ विलासने तिला मंत्रालयात बोलावून घेतले होते. तिथे त्याने तिची ओळख अरविंद पवारशी करुन दिली. अरविंद हा मंत्रालयीन कर्मचारी असून तोच तिचे काम करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिची टायपिंगची परिक्षा घेतली होती. ही परिक्षा पास झाल्यानंतर तिला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी बोलाविण्यात आले होते. तिथे तिची मेडीकल करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांनी नोकरीसाठी तिच्याकडे आणखीन पावणेतीनन लाखांची मागणी केली होती.
काही दिवसांनी या दोघांनी तिला लिपीक पदासाठी तिची थेट निवड झाल्याचे नियुक्तीपत्र दिले होते. मात्र तिला नोकरीवर रुजू होण्यास आणखीन काही दिवस लागतील असे सांगून ते दोघेही निघून गेले होते. त्यानंतर ते दोघेही तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. संपर्क साधल्यानंतर ते विविध कारण सांगून तिचे लवकरच काम होईल आणि ती कामावर रुजू होईल असे सांगत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने आरोग्य विभागात जाऊन तिच्या नियुक्तीपत्राची शहानिशा केली होती. यावेळी तिथे उपस्थित अधिकार्यांनी तिच्याकडे असलेले लिपीक पदाचे नियुक्तीपत्र बोगस असल्याचे सांगितले. अशा प्रकारे अरविंद पवार आणि विलास गमरे यांनी सुचिता चव्हाणला मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून नोकरीसाठी पावणेपाच लाख रुपये घेतले, तिला बोगस नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने मरिनड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर अरविंद पवार आणि विलास गमरे या दोघांविरुद्ध पोलिसांनी १७०, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात या दोघांनी ते मंत्रालयात कामावर असल्याची बतावणी करुन अनेकांना मंत्रालयात नोकरी भरती सुरु आहे. त्यांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केली आहे. अशाच एका गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली होती. सध्या जामिनावर आहेत. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा अशा प्रकारे फसवणुक करण्यास सुरुवात केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.