मराठा आरक्षण आंदोलन संपताच आता कारवाईला सुरुवात

विविध पोलीस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 सप्टेंबर 2025
मुंबई, – आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन संपताच आता मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लघंन करणार्‍या मराठा आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आतापर्यंत आठ पोलीस ठाण्यात अकराहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यात वांद्रे, गोवंडी, मरिनड्राईव्ह, आझाद मैदान, माता रमाबाई आंबेडकर मार्ग, जे. जे. मार्ग, डोंगरी, कुलाबा आदी पोलीस ठाण्याचा समावेश आहे. सर्वाधिक गुन्हे आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन करणे, बेकायदेशीर सभा घेणे तसेच अन्य कलमांतर्गत संबंधित गुन्हे दाखल झाले आहेत.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून उपोषण सुरु केले होते. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. पाच दिवसांच्या उपोषणानंतर राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडले होते. त्यानंतर सर्वच मराठा बांधव त्यांच्या जिल्ह्यांत निघून गेले होते. मात्र या पाच दिवसांत मराठा आंदोलकाकडून मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन करणे, बेकायदेशीर सभा घेणे तसेच अन्य कलमांचे उल्लघंन झाले होते.

मंगळवारी विविध आठ पोलीस ठाण्यात अकराहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन, आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन, माता रमाबाई आंबेडकर मार्ग, वांद्रे, गोवंडी, जे. जे मार्ग, डोंगरी, कुलाबा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण नऊ गुन्ह्यांचा समावेश आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध संबंधित गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल गुन्हे मागे घेण्याची तयारी राज्य शासनाने घेतल्याने या गुन्ह्यांत कुठल्याही आंदोलकाविरुद्ध कारवाई होणार नाही असे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page