मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जुलै २०२४
मुंबई, – तेरा वर्षांनी दुसर्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून भारतात आलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा गुरुवारी आयोजित करण्यात आलेला विजयी रॅलीचा कार्यक्रम अभूतपूर्व वातावरणात पार पडला, जवळपास तीन लाखांहून अधिक मुंबईकरांनी या रॅलीत सामिल होऊन भारतीय क्रिकेटपट्टूंचे अभिनंदन केले. याच गर्दीतून ६४ जणांचे मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आली आहे. त्यात ६० जणांनी प्रत्यक्षात तर चौघांनी ऑनलाईन तक्रार केली होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तेराजणांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. इतर मोबाईलचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भारतीय संघाने तेरा वर्षांनी दुसर्यांदा टी/२० विश्वचषक जिंकून भारतीयांची मने जिंकली होती. चार दिवसानंतर भारतीय क्रिकेट संघ भारतात आला होता. दिल्लीनंतर सायंकाळी मरिनड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम असा भारतीय क्रिकेटपट्टूसाठी विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या लाडक्या क्रिकेटपट्टूंचे अभिनंदन करण्यासाठी मरिनड्राईव्ह परिसरात लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी सामिल झाले होते. जवळपास तीन लाखांची गर्दी तिथे जमा झाली होती. याच गर्दीतून ६४ जणांचे मोबाईल गहाळ झाले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच ६० जणांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत मरिनड्राईव्ह पोलिसांत मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार केली होती तर चारजणांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. दिवसभरात पोलिसांना तेराा मोबाईल सापडले. ते सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले होते. विशेष म्हणजे इतकी गर्दी उसळली असताना तरुणीसह महिलांशी गैरवर्तन झाल्याची एकही तक्रार पोलिसांना प्रापत झाली नाही. प्रचंड गर्दीमुळे अकराजणांना गुदरमल्यासारखे झाले होते, काहींना किरकोळ दुखापत झाली होती. या सर्वांवर जवळच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. रस्त्यावर पडलेल्या पादत्राणांनी भरलेले दोन डंपर मरिनड्राईव्ह परिसरातून सफाई कर्मचार्यांनी गोळा केले होते. विजयी रॅलीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तामुळे हा कार्यक्रम सुरळीत पार पडला होता. याबाबत बंदोबस्तात असलेल्या सर्व पोलिसांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले होते.