दहा दिवसांतील कामात 3.57 कोटींच्या दागिन्यांवर हातसफाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 डिसेंबर 2025
मुंबई, – दहा दिवसांसाठी कामावर ठेवलेल्या केअरटेकर महिलेने एका वयोवृदध व्यावसायिकाच्या घरातील लॉकरमधील 3 कोटी 57 लाख रुपयांच्या विविध सोन्याचे, हिर्‍यांच्या दागिन्यांवर हातसफाई करुन पलायन केले. याप्रकणी चोरीचा गुन्हा दाखल होताच गेल्या पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपी महिलेला मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. अर्चना सुनिल साळवी असे या 44 वर्षीय महिलेचे नाव असून अटकेनंतर तिला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. तिच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 27 लाखांचा चोरीचे दागिने हस्तगत केले असून उर्वरित दागिने लवकरच हस्तगत केले जाणार आहे.

हर्ष भरत दलाल हे 65 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मरिनड्राईव्ह येथील भारती भुवन इमारतीच्या रुम क्रमांक सोळामध्ये राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरी रणजीत भुया, दिनेश निवाते, दिपक आणि सुगंधा मांडवकर नावाचे चार घरगडी असून या सर्वांवर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 27 एप्रिल ते 26 जुलै 2025 या कालावधीत त्यांच्या घरातील लॉकरमधील 3 कोटी 56 लाख रुपयांचे जुने मोती नेकलेस, डायमंड एअर रिंग, सोन्याचे कडा असा 1427 ग्रॅम हिरेजडीत सोन्याचे विविध दागिने चोरीस गेले होते. हा प्रकार हर्ष दलाल यांच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने त्यांना ही माहिती दिली होती. त्यांच्या घरी त्यांच्या चार नोकरांपैकी कोणीही येत नव्हते. त्यामुळे त्यापैकी एका नोकराने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन हर्ष दलाल यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती.

शहरातील एका नामांकित व्यावसायिकाच्या घरी झालेल्या साडेतीन कोटीच्या चोरीच्या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे यांनी गंभीर दखल घेत मरिनड्राईव्ह पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकिरण काशिद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल, पोलीस निरीक्षक अर्पणा व्हटकर, मनिषा घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद नागराळ, प्रदीप चौधरी, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास साठे, संजय पाटील, राकेश शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक यास्मीन मुल्ला, पोलीस हवालदार मधुकर बागुल, पोलीस शिपाई संदीप सांगळे, भारत किसे, मंगेश मलपुरे, मिलिंद मुलमुले, महिला पोलीस शिपाई गोरडे, मोकांशी यांनी तपास सुरु केला होता.

हर्ष हे कामानिमित्त दुबईत राहत होते, दोन महिन्यांतून ते मुंबईत आईला भेटण्यासाठी येत होते. त्यात हा गुन्हा नक्की कोणत्या दिवशी घडला याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तपासाची दिशा ठरविणे पोलिसांना प्रचंड अवघड झाले होते. तरीही पोलिसाीं घरातील सर्व नोकरांची चौकशी करुन जबानी नेांदवून घेतली होती, मात्र त्यांच्या चौकशीतून चोरीवर प्रकाश पडले अशी कुठलीही माहिती प्राप्त झाली नव्हती. पाच महिन्यानंतर या गुन्ह्यांत पोलिसांना एक महत्त्वाची माहिती प्राप्त झाली होती. त्यात अर्चना साळवी या महिलेचे नाव समोर आले होते.

अर्चना ही मे महिन्यांत त्यांच्या घरी दहा दिवसांच्या कामासाठी आली होती. तिला हर्ष दलाल यांच्या आईची देखभाल करण्यासाठी बोलाविले होते. दहा दिवस काम करुन ती कामावर येणे बंद झाली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी कल्याण येथून अर्चनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून पोलिसांनी 1249 ग्रॅम वजनाचे विविध सोने आणि हिर्‍याचे दागिने असा 1 कोटी 27 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काही दागिन्यांची तिने विक्री केली असून तिच्याकडून उर्वरित चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. अर्चना ही कल्याणच्या कोळसेवाडी, शिवसाई हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहते. चोरीच्या याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस प्रदीप चौधरी हे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page