नोकरीवरुन काढून टाकले म्हणून हॉटेल मालकाला खंडणीसाठी धमकी
हॉटेलच्या आर्थिक व्यवहाराचे कागदपत्रे आयकर विभागाला देण्याची धमकी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – क्षुल्लक वादातून नोकरीवरुन काढून टाकले म्हणून हॉटेल मालक असलेल्या एका वयोवृद्धाला त्याच्याच माजी व्यवस्थापकाने दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार चर्चगेट परिसरात उघडकीस आला आहे. हॉटेलच्या आर्थिक व्यवहाराचे कागदपत्रे आयकर विभागाला देऊन त्याने हॉटेल बदनामीची धमकी दिली होती. याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलिसांनी कृष्णाजी प्रसाद या व्यवस्थापकाविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची तसेच हॉटेलची बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या आरोपीचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे.
७६ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांच्या मालकीचे चर्चगेट एक हॉटेल आहे. तिथेच कृष्णाजी प्रसाद हा सात वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वी एका क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी कृष्णाजीला नोकरीवरुन काढून टाकले होते. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. त्यातून त्याने त्यांना फोन करुन दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्या हॉटेलच्या आर्थिक व्यवहाराचे काही कागदपत्रे त्याच्याकडे आहेत. ते कागदपत्रे आयकर विभागासह सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची त्याने त्यांना धमकी दिली होती. सुरुवातीला त्यांनी त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र तो सतत त्यांना दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देत होता. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार मरिनड्राईव्ह पोलिसांना सांगून तिथे कृष्णाजी प्रसादविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसह सोशल मिडीयावर हॉटेलची बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. चौकशीत कृष्णाजी प्रसाद हा कोलकाताच्या दार्जिलिंगचा रहिवाशी असून तो मुंबईतून त्याच्या गावी पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मरिनड्राईव्ह पोलिसांचे एक विशेष पथक कोलकाता येथे जाणार आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारीही संमातर तपास करत आहेत.